अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव व इथून निवडणूक लढणे हा माझा हक्क आहे.हा हक्क डावलण्यात आला. - ब्रिजभूषण पाझारे
एस.के.24 तास
चंद्रपूर : ही बंडखोरी नाही तर हा उठाव आहे.सलग पंधरा वर्षे मतदारसंघात काम केले, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पूर्ण तयारी केली आणि शेवटच्या काही तासांमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,महा आघाडी व महायुती असे सर्व पक्ष फिरून आलेल्याला उमेदवारी दिली गेली.हा खऱ्या अर्थाने अन्याय आहे.
अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे व इथून निवडणूक लढणे हा माझा हक्क आहे.मात्र, हा हक्क डावलण्यात आला,अशी प्रतिक्रिया भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांनी व्यक्त केली.
पाझारे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव होता.त्यांनी सुरुवातीला आत्महत्येचा इशाराही दिला होता. त्यानंतर ते दूरध्वनी बंद करून २४ तास अज्ञातस्थळी गेले होते.अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी कायम ठेवल्यानंतर पाझारे मंगळवारी सकाळी सर्वांसमक्ष अवतरले.
माध्यमांशी तसेच मतदारांशी संवाद साधताना पाझारे यांनी, कृपया मला बंडखोर म्हणून नका,अशी विनंती केली. अनुसूचित जातीसाठी राखीव या मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, अखेरच्या क्षणी एका सामान्य व गरीब कार्यकर्त्यावर पक्षाने अन्याय केला. त्यामुळेच आपण उठाव करण्याचा निर्णय घेतला,असे सांगितले.
समर्थक आहेत.पक्ष संघटनेत नेत्यांपेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा, तेव्हा कार्यकर्त्याला दुखावू नका, असा संदेश देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपने एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी नाकारली, याबद्दलही पाझारे यांनी दु:ख व्यक्त केले.
" गरिबांचा अमिताभ बच्चन " अशी ओळख असलेले पाझारे मागील १५ वर्षांपासून उमेदवारीसाठी संघर्ष करीत आहेत. नकोडा येथे एका गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या पाझारे यांनी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण विभागाचे सभापती,अशा विविध पदांवर काम केले.
बौद्ध समाजातून येणाऱ्या पाझारे यांनी २०१९ मध्ये चंद्रपुरातून उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्ष नेतृत्वाने आमदार नाना शामकुळे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत सलग दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली होती. पाझारे त्यावेळी अस्वस्थ झाले नाहीत किंवा पक्ष सोडून बंडाचा झेंडा हाती घेतला नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहून शामकुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविला होता.
तसेच मुनगंटीवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता, अशी ओळख निर्माण केली. यंदा उमेदवारी मिळेल, या आशेवर पाझारे यांनी अधिक जोमाने काम केले. मात्र, यंदाही त्यांना संधी मिळाली नाही. यामुळे त्यांनी बंडाचा झेंडा उंचावला आहे.