खासदार प्रतिभा धानोरकरांचा धमकीवजा इशारा " व्हायरल व्हिडीओ " ने खळबळ.

 खासदार प्रतिभा धानोरकरांचा धमकीवजा इशारा " व्हायरल व्हिडीओ " ने खळबळ.


एस.के.24 तास


वरोरा : वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ खासदार इमरान प्रतापगढी यांची प्रचारसभा सोमवारी झाली. या सभेला खासदार धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


खासदार धानोरकर म्हणाल्या, " आज जे लोक माझा विरोध करीत आहेत.माझ्या विरोधात बोलत आहेत. आत्ता मी कुणाला काहीही बोलणार नाही. त्यांनी लक्षात घ्यावे की, लोकसभा क्षेत्रात २८०० गावे आहेत. या गावांतील कोण कार्यकर्ता माझ्या बाजूने होता. कोण विरोधात होता. प्रत्येकाचा आढावा आजही माझ्याजवळ आहे. ही तर एक विधानसभा निवडणूक आहे. फक्त ३०० गावांची आहे.


या विधानसभेतील गावनिहाय, घरनिहाय कुणी विरोध केला आणि कोण बाजूने होता याचा चिठ्ठा काढण्यास फार वेळ लागणार नाही. २० नोव्हेंबरला मतदान झाले की गावनिहाय यादी माझ्याकडे येईल. कोणाला कसे ठेवायचे आणि कुणाला बारीक करायचे याचा सर्व विचार मी या ठिकाणी करून आहे, असा दमही त्यांनी दिला.


या मतदारसंघात दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीकडून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अनिल यांना काँग्रेसकडून उमेदवारी अपेक्षित होती. पण, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी जोर लावला. यावरून धानोरकर कुटुंबात फूट पडल्याचीही चर्चा आहे.


काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहे. तुम्ही अपक्षांच्या पाठिमागे राहिला तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या काळात घेणार असल्याचा धमकीवजा इशारा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, धानोरकर या कुणबी समाजाच्या मतांच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !