पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती ; ग्रा.पं.आंबटपल्ली चा येरमेटोला गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. ■ सरपंच व सचिव यांचा भोंगळ कारभार.



पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती
; ग्रा.पं.आंबटपल्ली चा येरमेटोला गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.


■ सरपंच व सचिव यांचा भोंगळ कारभार.

 

एस.के.24 तास


मुलचेरा : ग्रामपंचायत आंबटपल्ली अंतर्गत येत असलेल्या मौजा येरमेटोला (चिचेला) येथील महिलांची मागील दोन ते तीन महिण्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती चालू आहे.या गावात एकूण दोन हातपंप असून या ठिकाणच्या एका हातपंपाचे साहित्य सरपंच उमेश कडते व सचिव मोरेश्वर वेलादी यांनी काढून घेतले व या घटनेला दोन वर्षाचा कालावधी लोटूनही अजुनपर्यंत ते साहित्य लावून न दिल्याने तो हातपंप पूर्णपणे बंद आहे.

       


आणखी एक हातपंप मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी बंद झाले असून गावक-र्यांकडून सरपंच व सचिव यांना वारंवार सांगूनही दुरुस्त करून न दिल्याने गावकऱ्यांना गावालगतच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. महीलांचे म्हणणे असे आहे की, एकदा आणलेले पाणी चार दिवस प्यावे लागत आहे.

      

ग्रा.पं.आंबटपल्ली सदर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लहान मुलांना पोषण आहार शिजवून  देणे, मुलांचे हात धुणे व इतर गोष्टींसाठी पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या निर्माण झाल्याचे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे म्हणणे आहे.

 

या गावातील महिलांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर मोलमजूरी करून सायंकाळी उशिरापर्यंत घरी आल्यानंतर पून्हा एक किलोमीटर पायी जाऊन नाल्यातून पाणी आणण्यासाठी जाताना किंवा येताना जंगली प्राण्यांपासुन काही अनर्थ तर घडणार नाही ना ? ही भीती या महिलांना सतावत असताना देखील नाईलाजास्तव नाल्यातील गडुळ पाणी आणून प्यावं लागत असल्याचे विदारक दृश्य पाहवयास मिळत आहे.

 

सदर बाबीकडे संबंधीत अधिकारी लक्ष देतील काय ? महिलांचा व लहान मुलांचा त्रास कमी होणार काय? अंगणवाडी केंद्रातील पाण्याची समस्या दुर कधी होणार ? हातपंप कधी दुरुस्त होतील ? या सर्व प्रश्नांच्या उत्तराकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.


येरमेटोला येथे एकूण दोन हातपंप असून  एका हातपंपाचे साहित्य काढून विद्यमान सरपंच उमेश कडते व सचिव मोरेश्वर वेलादी यांनी गहाळ केल्याने हातपंप मागील दिड ते दोन वर्षांपासुन बंद आहे. आणखी एक हातपंप मागील दोन ते तीन महिन्यांपासून बंद आहे, वारंवार सांगूनही दुरुस्त करून न दिल्याने लेखी अर्ज देऊनही ग्रा पं. आंबटपल्ली येथील सरपंच व सचिव  जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. - पांडुरंग नामदेव येरमे माजी सरपंच ग्रा.पं. आंबटपल्ली



येरमेटोला येथील दोन्ही हातपंप बंद असल्याने आम्हच्या अंगनवाडी केंद्रातील मुलांना पोषण आहार देणे, मुलांचे हात धुणे व इतर गोष्टिंसाठी पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या होत आहे, याकडे ग्रामपंचायतचे पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. - ज्योती पांडुरंग येरमे अंगणवाडी सेविका येरमेटोला

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !