लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यात काँग्रेसला अपयश ; नेत्यांमधील चढाओढ कारणीभूत.

2 minute read

लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यात काँग्रेसला अपयशनेत्यांमधील चढाओढ कारणीभूत.


एस.के.24 तास


चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यात काँग्रेसला अपयश आले.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे या त्रिकुटांमधील चढाओढ,कार्यकर्त्यांसोबत समन्वयाचा अभाव, ही प्रमुख कारणे यामागे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर २ लाख ६० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. धानोरकर यांना सर्व सहा मतदारसंघांत विक्रमी आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही मतांची आघाडी मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना होता. मात्र, चित्र पूर्ण पालटले.


लोकसभा निवडणुकीत राजुरा मतदार संघात धानोरकर यांना १ लाख ३० हजार मते मिळाली होती,तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना ७१ हजार मते मिळाली होती. लोकसभेत ५० हजारांची आघाडी मिळाल्यानंतरही विधानसभेत काँग्रेसचे सुभाष धोटे यांना केवळ ६९ हजार मते मिळाली.उलट भाजपचे मताधिक्य येथे दोन हजार मतांनी वाढले.भाजपचे देवराव भोंगळे यांना ७३ हजार मते मिळाली.


चंद्रपूर मतदारसंघात धानोरकर यांना १ लाख १९ हजार, तर मुनगंटीवार यांना ८० हजार मते मिळाली होती. ३९ हजार मतांची आघाडी धानोरकर यांनी घेतली होती. विधानसभा निवढणुकीत काँग्रेसचे मताधिक्य कमी होऊन प्रवीण पडवेकर यांना ८४ हजार मते मिळाली तर भाजपचे किशोर जोरगेवार यांना १ लाख ६ हजार मते मिळाली. जोरगेवार २२ हजारापेक्षा अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले.


बल्लारपूर मतदारसंघात काँग्रेसने लोकसभेत १ लाख २१ हजार मते घेतली होती, तर भाजपला ७३ हजार मते मिळाली होती.लोकसभेत काँग्रेसची ४८ हजारांची आघाडी असतानाही विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी २६ हजार मतांची आघाडी घेत १ लाख ४ हजारांपेक्षा अधिक मते घेतली. काँग्रेसचे संतोष सिंह रावत यांना ७८ हजार मते मिळाली.


वरोरा या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मतदारसंघात काँग्रेसने लोकसभेत १ लाख ४ हजार मते, तर भाजपने ६७ हजार मते घेतली.विधानसभेत काँग्रेसने येथे चुकीचा उमेदवार दिल्याने त्याला केवळ २५ हजार मते मिळाली. भाजपला ६५ हजार मते मिळाली. हीच अवस्था लोकसभा मतदारसंघातील आर्णी या यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातही झाली. आर्णीमध्ये भाजपचे तोडसाम यांना मताधिक्य मिळाले.


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील वरील पाचही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराने आघाडी घेतली नाही.काँग्रेसचे मताधिक्य सहा महिन्यांत कमी झाले.केवळ काँग्रेस नेत्यांमधील भांडणे हे एकमेव कारण या सर्वाला कारणीभूत आहे,असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !