फडणवीस व अहीर यांच्यात टोकाचे मतभेद होते.आता अहीर व मुनगंटीवार यांच्यातील मतभेदाने टोक गाठले आहे.
★ विधानसभा निवडणुकीत चंद्रपुरात भाजपला गटबाजीचे ग्रहण.
एस.के.24 तास
चंद्रपूर : ऐन विधानसभा निवडणुकीत जिल्हा भाजपमध्ये कधी नव्हे इतकी उघड गटबाजी बघायला मिळत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील मतभेद जाहीरपणे समोर येत आहेत.
शिस्तबद्ध पक्ष अशी बतावणी करणाऱ्या भाजपत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून गटबाजी उफाळून आली आहे. पूर्वी जिल्हा भाजपमध्ये माजी मंत्री शोभा फडणवीस, हंसराज अहीर व सुधीर मुनगंटीवार असे तीन गट सक्रिय होते. त्यातही फडणवीस व अहीर यांच्यात टोकाचे मतभेद होते. मात्र, आता अहीर व मुनगंटीवार यांच्यातील मतभेदाने टोक गाठले आहे. जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाने या गटबाजीला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे.
राजुरा येथे मुनगंटीवार समर्थक देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर होताच अहीर समर्थक माजी आमदार ॲड. संजय धोटे व खुशाल बोंडे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘पार्सल’ उमेदवार नको, अशी त्यांची भूमिका होती. आताही ते प्रचारात सक्रिय नाहीत.
स्वतःच्या बल्लारपूर मतदारसंघात मुनगंटीवार सहकाऱ्यांच्या साथीने किल्ला लढवीत आहेत. भाजपच्या जिल्हा संघटनेवर मुनगंटीवार गटाचे वर्चस्व असल्याने ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी त्यांच्या प्रचारात आहेत. मात्र, अहीर या मतदारसंघात पाय ठेवायला तयार नाहीत. त्यांनी राजुरा मतदारसंघातही जाणे टाळले.भोंगळे यांच्या पाठीशी मुनगंटीवार सुरुवातीपासून उभे आहेत.
वरोरा मतदारसंघाची जबाबदारी अहीर यांच्यावर आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांनी तेथे जाणे टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने मुनगंटीवार यांनी चिमूरमध्ये बंटी भांगडिया यांच्या प्रचारार्थ धडाकेबाज भाषण ठोकले. मात्र, अद्याप ते ब्रम्हपुरीत प्रचारासाठी गेले नाहीत.
जोरगेवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपुरातील सभेला मुनगंटीवार यांनी दांडी मारली. यावरून जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त करीत २३ नोव्हेंबरनंतर जिल्ह्याचे राजकारण बदलणार, असे भाकीत वर्तवले. एवढेच नाही तर जोरगेवार इतर सभांतही अशाच पद्धतीने व्यक्त होत आहेत. तसेच खासगी चर्चेतही भाजप संघटनेबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करीत आहेत.
परिणामी मुनगंटीवार समर्थक भाजप पदाधिकारी हळूहळू त्यांच्या प्रचारातून अंग काढून घेत आहेत. विशेष म्हणजे, भाजप पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी यंग चांदा ब्रिगेडची स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे.भाजपचा कोणता पदाधिकारी काय करीत आहे,यावर लक्ष ठेवले जात आहे. जोरगेवारांच्या या वर्तणुकीमुळे मुनगंटीवार समर्थक नाराज आहेत.
काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते बंडखोर ब्रिजभूषण पाझारे यांना उघडपणे मदत करीत आहे. जोरगेवार यांनी आपल्या प्रचार कार्यालयाची सर्व सूत्रे अहीर समर्थकांकडे सोपवली आहेत. विशेष म्हणजे,या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले होते.