भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवारीत " लाडक्या बहिणीं " ना डावलले.
★ चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदार संघात केवळ 8 महिला उमेदवार ; चिमूर,ब्रम्हपुरी एकही महिला रिंगणात नाही.
एस.के.24 तास
चंद्रपूर : भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवारीत " लाडक्या बहिणीं " ना डावलले,तर रिपब्लिकन पक्षाने 2 रणरागिनींना उमेदवारी दिली आहे.जिल्ह्यातील 6 मतदारसंघांत एकूण 94 उमेदवारांमध्ये केवळ 8 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
चिमूर व ब्रम्हपुरी या दोन मतदार संघात तर एकही महिला उमेदवार नाही.
सर्वाधिक 20 उमेदवार बल्लारपूर मतदार संघात आहेत.येथे डॉ.अभिलाषा गावतुरे,छाया गावतुरे, सौ.निशा धोंगडे या तीन महिला उमेदवार आहेत.
यातील डॉ.गावतुरे यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.काँग्रेसने नाकारली.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांनी गावतुरे यांच्या नावाला अगदी सुरुवाती पासूनच विरोध दर्शविला होता.त्यामुळे डॉ.गावतुरे यांचे नाव मागे पडले.
राजुरा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या प्रिया बंडू खाडे, किरण गेडाम व चित्रलेखा धंदरे या तीन महिला उमेदवारांचा समावेश आहे.वरोरा मतदारसंघात १८ उमेदवारांमध्ये तारा काळे या एकमेव महिला उमेदवार आहेत.चंद्रपूर मतदारसंघात १६ उमेदवारांमध्ये नभा वाघमारे या एकमेव महिला उमेदवार रिपब्लिकन पक्षाकडून रिंगणात आहेत.
ब्रम्हपुरी व चिमूर या दोन मतदारसंघांत प्रत्येकी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून एकही महिला उमेदवार नाही.आज महिला मतदारांची संख्या निम्मी आहे.काही मतदारसंघांत तर महिलांची संख्या अधिक आहे.तिथेही महिला उमेदवार नाहीत.