नेत्यांनो,मत मागायला येऊ नका...!असे वस्तीतील लोक का म्हणाले ?
एस.के.24 तास
नागपूर : कळमना भागात भटक्या जमातीची वस्ती आहे. त्यांना राज्य शासनाने जमीन देऊन ४० वर्षांपूर्वी येथे वसवले.परंतु अद्याप जातीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही.त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ ते घेऊ शकत नाहीत.त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या वस्तीत कोणत्याही पक्षाने मत मागायला येऊ नये,अशा आशयाचे फलक लावले आहेत.
राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कळमना येथील पांगूळ समाजाच्या वस्तीत हे फलक लावण्यात आले आहेत.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला.त्यानुसार अनेक महामंडळे स्थापन करण्याच्या घोषणा केल्या.
एवढेच नव्हेतर विविध जाती,धर्मांना आकर्षित करण्यासाठी शेकडो आदेश काढले.परंतु पांगूळ समाजाचे प्रश्न मार्गी लागलेले नाही. त्यामुळे आता या वस्तीतील नागरिकांनी आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी फलक लावल्याचे दिसून येत आहे.
यावरील मजकूर बोलका आहे. येथील नागरिक त्यांची व्यथा त्यातून मांडतात. ‘‘ साहेब आम्ही भारतीय आहोत आणि भटक्या विमुक्त जमातीत मोडतो.आमच्याकडे जमीन नाही.त्यामुळे महसूल पुरावा नाही. आजोबा, पणजोबा, वडिलांनी शिक्षण घेतले नाही. त्यामुळे जातीची नोंद कागदोपत्री होऊ शकली नाही.
आमचा व्यवसाय पांगुळ आहे. ‘दान पावले हो’ म्हणताना वडिलाला, आजोबाला बघितले आहे. आता आमची मुले मोठी झाली, शिकायला लागली, त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा, आम्हाला घरकूल मिळावे. पण या योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र हवे असते. त्यासाठी आम्ही अनेकदा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आमदार, खासदार, नगरसेवक, समाजकल्याण अधिकारी यांची भेट घेतली.
पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. एकदाची आमची जात कोणती ते तरी ठरवा आणि तसे प्रमाणपत्र द्या, असे फलकावर लिहिले आहे. निवडणूक असल्याने मते मागण्यासाठी सर्व पक्षाचे उमेदवार वस्तीत येतील.पण आमचे प्रश्न सुटत नसतील तर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने आमच्या वस्तीत येऊ नये. आमची जात वैध नाही मग आमचे मतदान कसे वैध, असा सवालही या फलकाद्वारे विचारण्यात आला आहे.
हलबा समाजाला डावलणाऱ्यां विरोधात मतदान : -
मध्य नागपुरात हलबा समाजाला डावलणाऱ्यां विरोधात मतदानाचे आवाहन करणारे फलक हलबा क्रांती सेनेने लावले आहेत. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मध्य नागपूरच्या उमेदवाराचे नाव नाही.येथून भाजपच्या तिकिटावर हलबा समाजाचे विकास कुंभारे सलग तीन वेळा निवडून आले.
चौथ्यांदाही त्यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. सोबत प्रवीण भिसीकर आणि भास्कर परातेही उमेदवारी मागत आहेत. परंतु, प्रवीण दटके यांनी येथून उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे भाजपचे हलबा समाजाचे पदाधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत. काँग्रेसने मागच्या निवडणुकीत बंटी शेळके यांना उमेदवारी दिली होती.
ते थोड्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे काँग्रेसकडून तेच उमेदवार असतील असे मानले जात आहे. तसेच येथून नंदा पराते, रमेश पुणेकर सह इतरही हलबा पदाधिकारी उमेदवारी मागत आहेत. परंतु, त्यावर काँग्रेसचे नेते बोलायला तयार नाहीत. त्यामुळे आता हलबा क्रांती सेनेकडून लावलेल्या इशारा फलकाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. हलबा समाजाला जो पक्ष उमेदवारी देणार नाही, त्याच्याविरोधात संपूर्ण विदर्भात मतदान करण्याचा इशारा यातून देण्यात आला आहे.