वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून उत्तम डॉक्टर व आरोग्य व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. - खासदार डॉ. नामदेव किरसान
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम आणि मागास जिल्हा असून जिल्ह्यात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. अश्या परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होणे आनंदाची बाब आहे,मात्र महाविद्यालयाच्या माध्यमातून उत्तम डॉक्टर निर्माण होऊन आरोग्य व्यवस्था सुद्धा सुधारली पाहिजे,जिल्ह्यातील कोणताही रुग्ण उपचाराकरीता जिल्ह्याबाहेर जाऊ नये अशी व्यवस्था महाविद्यालय व्यवस्थापकांनी निर्माण करावी अश्या सूचना खासदार डॉ.नामदेव किरसाण यांनी दिल्या.
सोबतच लवकरात लवकर महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करून आवश्यकतेनुसार यंत्र सामग्री उपलब्ध करा, लोकप्रतिनिधी म्हुणुन आवश्यकता पडेल त्या ठिकाणी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे खासदार डॉ. किरसान यांनी आश्वास्त केले. गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महाविद्यालयाचे उदघाट्न दुरदृश्य प्रणालीदवारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखली आयोजित या कार्यक्रमालाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य केंद्रीय मंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके तसेच इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.