गुणवंत विद्यार्थी घडविणे हे समाज व पालकांची जबाबदारी. - डॉ.मोहन कापगते
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,२३/१०/२४ केवळ गुणांची सूज म्हणजेच गुणवत्ता नाही. तर येणारा काळ हा अधिक स्पर्धेचा व नवीन तंत्रज्ञानाचा राहणार आहे. यासाठी पालकांनी मुलांची मानसिक, शारीरिक व बौद्धिक वाढीची काळजी घेणे आवश्यक आहे. सिलॅबस मधील अभ्यास केवळ गुणांसाठी नाही तर आपल्या गुणवत्तेसाठी उपयोगात आणावा.
पालकांनी आपल्या मुलांसाठी केवळ चकचकीत रस्ते तयार न करता वाटेत येणारे, जीवनात येणारे खाच -खळगे आपल्या पल्ल्यांना पार करू द्यावे, छोटया -मोठ्या संकटांचा सामना करू द्यावा असे विचार प्रा. डॉ. मोहन कापगते यांनी व्यक्त केले. ते कोहळी समाज बहुउद्देशीय कल्याण मंडळ नवरगाव तर्फे आयोजित स्नेहमीलन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
नंदिनी सभागृहात नुकताच पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त कार्यकारी अभियंता उमाकांत पार्वते हे होते. तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ. मोहन कापगते, इतिहास विभाग प्रमुख, ने. हि. महाविद्यालय, ब्रम्हपुरी, ओमप्रकाश सोनवाणे, गडचिरोली हे होते. मंडळाचे अध्यक्ष नानाजी बोरकर, उपाध्यक्ष विनोद बोरकर, सचिव मनोहर सहारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील कोहळी समाजातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक विनोद बोरकर, सूत्रसंचालन प्रा. विष्णू बोरकर तर आहे आभार विनोद गहाणे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.