गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली च्या शरयू करेवार ची राष्ट्रीय पातळीवर झेप दिल्लीत खेळणार ; गडचिरोली ची तिरंदाज पोहोचली राजधानीत.
एस.के.24 तास
गडचिरोली : प्लॅटिनम ज्युबिली शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या शरयू नारायण करेवार या विद्यार्थिनीने गडचिरोलीच्या मुकूटात अभिमानाचा तुरा खोवला आहे. शरयूने पुणे येथील झोनस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावत राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
पुण्यातील स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, केरळ, लक्षद्वीप आणि दादरा व नगर हवेलीमधील निवडक 75 शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून केवळ दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली. त्यात गडचिरोलीच्या शरयू करेवारचा समावेश आहे.
तिच्या या कामगिरीमुळे तिला देशाची राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या सीबीएसई साऊथ झोन II तिरंदाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे, ज्यामुळे तिचा राष्ट्रीय पातळीवरील प्रवास अधिक प्रकाशमान होणार आहे.
प्लॅटिनम शाळेचे महासचिव अझिझ नाथानी आणि प्राचार्य रहीम अमलानी यांनी शरयूच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शरयूने तिच्या यशाचे श्रेय प्रशिक्षक रोशन साळुंखे आणि अनिल निकोडे, शिक्षकवृंद आणि कुटुंबीयांना दिले. माझ्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेचा पाठिंबा, आणि कुटुंबीयांचे प्रेम यामुळेच मला हे यश मिळवता आले, अशी भावना शरयूने व्यक्त केली.