रानटी हत्ती पुन्हा चुरचुरा च्या जंगलात सक्रिय ; पोर्ला वनपरिक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस.
एस.के.24 तास
गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्राच्या जंगलातून मरेगाव बिटातील देलोडा परिसरात हत्तींनी सोमवारी प्रवेश केला. येथे एक दिवस धुडगूस घातल्यानंतर हत्तींच्या कळपाने पुन्हा चुरचुरा चेक परिसरात पुनरागमन केले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची धाकधूक पुन्हा वाढलेली आहे.
हत्तींचा कळप १० दिवसांपूर्वी गडचिरोली वन विभागातून दिभनाच्या जंगलात दाखल झाला होता. या कळपाने दिभना,जेप्रा, कळमटोला,धुंडेशिवणी व पिपरटोला भागातील शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस करीत चुरचुरा जंगल परिसरात प्रवेश केला. या भागात तीन ते चार दिवस धान पिकावर ताव मारला. पुन्हा हा कळप नवरगावमार्गे देलोडा बिटात सोमवारी दाखल झाला. येथे एक दिवस शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी केल्यानंतर हा कळप पुढे सिर्सी बिटात जाईल, असे वाटत होते; परंतु हत्तींनी आपला मोर्चा चुरचुरा कडे वळविला.
कापणीला आलेले धानपीक हिरावतोय कळप सध्या अल्प मुदतीच्या व मध्यम प्रतिच्या धानाची कापणी व बांधणी सुरू आहे. काही भागांत अल्प मुदतीच्या धान पिकाची मळणीसुद्धा सुरू झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या हातात येणाऱ्या उभ्या पिकांवरही हत्तींचा कळप ताव मारत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. चुरचुरा व देलोडा भागातील अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस हत्तींच्या कळपाने केलेली आहे.
कळपाचे तळ्यात मळ्यात रानटी हत्तींचा कळप दोन दिवसांपूर्वी पाल नदी ओलांडून मरेगाव उपक्षेत्रातील देलोडा परिसरात दाखल झाला; परंतु, तेथील वातावरण कळपाला मानवले नसावे.पुन्हा हा कळप चुरचुरा चेक परिसरात मागे फिरला. यामुळे या कळपाचे सध्यातरी तळ्यात मळ्यात दिसून येत आहे.