काँग्रेस चे वजनदार नेते अशी ओळख असलेले माजी प्रदेशाध्यक्ष,माणिकराव ठाकरे मतदारसंघ मिळेना...
एस.के.24 तास
यवतमाळ : काँग्रेसचे वजनदार नेते अशी ओळख असलेले माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना यवतमाळ जिल्ह्यात स्वत:साठी मतदारसंघ राखता आला नाही. त्यामुळे पक्षात त्यांचा प्रभाव कमी झाला की, पक्षांतर्गत गटबाजीतून त्यांना डावलले, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.दिग्रस हा माणिकराव ठाकरे यांचा गृह मतदारसंघ आहे. पूर्वीच्या दारव्हा मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. २००४ मध्ये शिवसेनेचे संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर माणिकराव ठाकरे थेट राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले.
विधानपरिषदेचे आमदार, प्रदेशाध्यक्ष, विविध राज्यांचे निवडणूक प्रभारी अशी अनेक पदे त्यांना मिळाली. राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना गृह मतदारसंघ असलेल्या दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातही त्यांनी संपर्क कायम ठेवला. मुलगा राहुल ठाकरे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बसविले. त्यामुळे माणिकराव ठाकरे हे काँग्रेसमधील वजनदार नेते आहेत, हे वारंवार सिद्ध होत होते.
यावेळी दिग्रस विधानसभा मतदारसंघात राहुल ठाकरे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून ते प्रयत्नशील होते. राहुल ठाकरे हे या मतदारसंघात सक्रिय आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव ठाकरे) संजय देशमुख विजयी झाले. या निवडणुकीत ठाकरे पिता-पुत्राने देशमुख यांच्या विजयासाठी कंबर कसली. त्याचेवळी राहुल ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम पूर्ण केली.
तसेच महाविकास आघाडीत दिग्रस मतदारसंघ काँग्रेसला सुटेल, असा शब्दही वरिष्ठ नेत्यांकडून घेतला. मात्र शुक्रवारी या मतदारसंघात शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली. नेर शहरात एक व्यावसायिक म्हणून ओळख असलेल्या पवन जयस्वाल यांना महाविकास आघाडीने कोणत्या ‘इलेक्टिव मेरिट’वर उमेदवारी दिली, याची चर्चा मतदारसंघात आहे. खासदार संजय देशमुख हे स्वत: जयस्वाल यांच्यासाठी पक्षाचा एबी फॉर्म घेऊन आल्याचे सांगण्यात येते.
या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असताना तो शिवसेनेला सुटल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात कुणबी, मराठा समाजाची दुसऱ्या क्रमांकाची ४० ते ४५ हजार मते आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड यांच्या विरोधात राहुल ठाकरे यांच्याऐवजी माणिकराव ठाकरे यांना उमदेवारी द्यावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र पक्षाने माणिकराव ठाकरे आणि राहुल ठाकरे या पिता-पुत्रास उमदेवारी न दिल्याने काँग्रेस पक्षात नाराजी आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या बहुतांश बैठकीत माणिकराव ठाकरे सहभागी होते. तरीही त्यांना स्वत:साठी मतदारसंघ राखता आला नसल्याने, आर्श्चय व्यक्त होत आहे. उमेदवारीसाठी शब्द देवून तो फिरवून खासदार संजय देशमुख यांनी विश्वासघात केल्याची भावना काँग्रेसमध्ये व कुणबी समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे दिग्रस मतदारसंघात महाविकास आघाडीतील मतभेद महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
योग्य निर्णय घेऊ. - राहुल ठाकरे
पुढची रणनिती काय राहील याबाबत पक्षनेते माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री बैठक झाल्यानंतर योग्य निर्णय घेऊ,अशी प्रतिक्रिया राहुल माणिकराव ठाकरे यांनी दिली.