लॉज वर चालवत होते सेक्स रॅकेट ; पोलिसांनी छापा टाकत चार परप्रांतीय मुलींची केली सुटका.
नाशिक : लॉजवर महिला बोलावून त्यांच्या कडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या लॉज मालकावर पोलिसांनी छापा टाकत चार परप्रांतीय मुलींची सुटका केली.विशेष म्हणजे पुणे येथील एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पंचवटी पोलिसांनी हा अड्डा उध्वस्त केला.सदर लॉज पंचवटी येथे स्थित आहे.
या कारवाईमध्ये पश्चिम बंगाल, गुजरात आणि झारखंड येथील चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. लॉज मालक आणि मॅनेजर विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याअन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील प्रोग्राम असोसिएटस, फ्रिडम फर्म या संस्थेचे पदाधिकारी यांना नाशिकमध्ये पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांकडून बळजबरीने देहविक्री करून घेत असल्याची माहिती मिळाली होती.
याबाबतत्यांनी शुक्रवार ११ रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार एक पथक तयार करून पंचवटी परिसरातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल न्यू करवलीच्या पाठीमागे असलेल्या मधुबन लॉज येथे पथक पोहचले. यावेळी एक बनावट ग्राहक या लॉजमध्ये पाठविण्यात आले होते.
या बनावट ग्राहकाने देहविक्री सुरु असल्याचा इशारा देताच पथकाने लॉजवर छापा टाकला. यावेळी याठिकाणी झारखंड, पश्चिम बंगाल आणि गुजरात येथून आणलेल्या चार महिलांना ताब्यात घेतले. तसेच, या महिलांसोबत अय्याशी करण्यासाठी आलेल्या वरवंडी, ता. दिंडोरी आणि कुरी,ता.चांदवड येथील दोघा संशयितां
पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देहविक्रीबाबत पीडित महिलांना विचारले असता लॉज मालक संशयित प्रवीण खर्डे यांनी आपल्याला साफसफाईच्या कामासाठी आणल्याचे सांगितले. मात्र, आम्ही परराज्यातील असल्याचा गैरफायदा घेत साफसफाईचे काम न देता आमच्याकडून देहविक्री करून घेत असल्याचे सांगितले.
तसेच, आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन देहविक्री करून घेत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यावेळी पोलिसांनी याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कंडोम जप्त केले आहे.
तसेच, संशयित लॉज मालक प्रवीण मधुकर खर्डे, रा. नाशिक आणि लॉज मॅनेजर मंटूकुमार सीताराम यादव, ३२, रा. मधुबन लॉजिंग, नाशिक, मूळ रा. काटाटोली, ता. जि. रांची, झारखंड यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.