चामोर्शी तालुक्यात एकदिवसीय मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा संपन्न.
एस.के.24 तास
चामोर्शी : तालुक्यात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन अंतर्गत 58 शाळांमध्ये आणि 37 गावांमध्ये "मॅजिक बस क्रियाकलापातून विकास" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांना आणि गावांना आरोग्यदायी जीवनशैली,पोषण आहार,स्वच्छता,शारीरिक तंदुरुस्ती आणि जीवन कौशल्य याचे महत्त्व समजावले जात आहे.या उपक्रमांतर्गत क्रियाकलापाच्या माध्यमातून मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते.
या उपक्रमा बद्दल आज दिनांक १०/१०/२०२४ रोज गुरुवार ला आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांना प्रत्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेमध्ये उपस्थित शिक्षकांना विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिक करून दाखवले गेले. यामध्ये आरोग्यविषयक जनजागृती, मुलांमध्ये स्वच्छतेची सवय लावणे, पौष्टिक आहाराचे महत्त्व, खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या एकदिवसीय कार्यक्रमाला उपस्थित पंचायत समिती चामोर्शीचे गटशिक्षणाधिकारी टेंभुर्णे साहेब, मॅजिक बस जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, गट साधन केंद्र समन्वयक सोरते साहेब, केंद्रप्रमुख पिपरे साहेब आणि गोमासे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य प्रशिक्षक दिनेश कामतवार आणि योगिता सातपुते यांनी कृतीयुक्त प्रशिक्षण घेतले. तसेच चामोर्शीतील सर्व युवा मार्गदर्शकांनी सहकार्य केले.
या कार्यशाळेमुळे मुलांचे आरोग्य,स्वच्छता,पोषण आहार व जीवन कौशल्य असा नवीन दृष्टिकोन शिक्षकांना मिळाला असून,आपल्या शाळांमध्ये या उपक्रमाला यशस्वीपणे राबविण्याचे आश्वासन दिले.