रेल्वे स्थानक परिसरात आढळला युवती चा निर्वस्त्र मृतदेह ; हत्येचा संशय.
एस.के.24 तास
अमरावती : बडनेरा रेल्वे स्थानकाच्या मागील वाहनतळानजीक पाण्याच्या टाकीजवळ मंगळवारी सकाळी एका २२ वर्षीय युवतीचा मृतदेह निर्वस्त्र स्थितीत सापडल्याने एकच खळबळ उडाली.मृतदेह शेजारी रक्ताचे डाग आणि युवतीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत.युवतीची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूने असलेल्या वाहनतळाजवळ पाण्याच्या टाकीखाली खोली बांधण्यात आली आहे. या खोलीला लागूनच जमिनीवर अज्ञात युवतीचा मृतदेह आढळून आला.परिसरातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि बडनेरा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. मृतदेहाशेजारी त्यांना रक्ताचे डाग आढळून आले आणि युवतीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा असल्याचे दिसून आले. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. या युवतीची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तीनही यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे.
या युवतीचे वय अंदाजे २२ वर्षे आहे. तिची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. शवविच्छेदनातून इतर बाबींचा उलगडा होऊ शकेल. रेल्वे स्थानक परिसरात रात्रभर वर्दळ असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.