चंद्रपूर जिल्ह्यात नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवारीसाठी.. ; काँग्रेसला घराणेशाहीचे ग्रहण.
★ काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता दु:खावला असून नाराजीत ; कार्यकर्त्यांनी झेंडेच उचलायचे काय ?
एस.के.24 तास
चंद्रपूर : जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला घराणेशाहीचे ग्रहण लागले आहे.नेत्याच्या कुटुंबातील सदस्य खासदार, आमदार,माजी नगराध्यक्ष किंवा पक्षसंघटनेत पदाधिकारी आहेतच, आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठीही ते सरसावले आहेत.
यामुळे काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता कमालीचा दु:खावला असून नाराज आहे.देशपातळीवर काँग्रेस पक्षात घराणेशाही असल्याचा आरोप भाजपाकडून नेहमीच होत आला आहे. आता जिल्हास्तरावरही तिच स्थिती दिसून येत आहे. प्रस्थापित नेत्याच्या कुटुंबातील व्यक्तीला डावलून सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसबने उमेदवारी दिल्याचे उदाहरण गेल्या कित्येक वर्षांत बघायला मिळाले नाही.चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.या सहाही मतदारसंघांत नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच उमेदवारीसाठी आग्रही दिसत आहे.
कार्यकर्त्यांनी झेंडेच उचलायचे काय ?
वरोरा विधानसभा मतदारसंघात पूर्वी दिवं.दादासाहेब देवतळे कुटुंबाचे वर्चस्व होते.संजय देवतळे आमदार व मंत्री होते,तर डॉ. विजय देवतळे,डॉ.आसावरी देवतळे जिल्हा बँकेत संचालक व जिल्हा परिषदेत सभापती, सदस्य राहिलेत.
यानंतर बाळू धानोरकर खासदार झालेत. त्यांची पत्नी,प्रतिभा धानोरकर या आमदार झाल्यात आणि सध्या त्या विद्यमान खासदार आहेत.धानोरकर कुटुंबातील अनिल धानोरकर भद्रावतीचे नगराध्यक्ष होते. आता धानोरकर कुटुंबाशीच संबंधित अनिल धानोरकर यांच्यासह राजेंद्र चिकटे व प्रवीण काकडे विधानसभेसाठी इच्छुक आहेत.यामुळे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते दुखावले असून आम्ही कायम झेंडेच उचलावेत का, असा प्रश्न ते विचारू लागले आहेत.
राजुरातील परीस्थिती काय ?
राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचे वर्चस्व होते. त्यांचे बंधु अरूण धोटे राजुराचे माजी नगराध्यक्ष.दुसरे बंधू शेखर धोटे जिल्हा बँकेत संचालक.पुतण्या शंतनू धोटे युवक काँग्रेस अध्यक्ष.
आता अरूण धोटे विधानसभा लढण्यास इच्छुक असून पक्षश्रेष्ठीकडे त्यांनी तशी इच्छा बोलून दाखविली आहे.त्यामुळे बाजार समितीचे संचालक उमाकांत धांडे, आशीष देरकर यांनी विधानसभा लढण्याची इच्छा प्रदर्शित करून व उमेदवारी अर्ज सादर करूनही त्यांना डावलले जाईल,अशी स्थिती आहे.
चिमूर मध्ये वारजूकर कुटुंबाचे वर्चस्व : -
चिमूर विधानसभा मतदार संघात मागील पंधरा वर्षांपासून डॉ.अविनाश वारजूकर,डॉ.सतिश वारजूकर या दोन भावंडांशिवाय तिसरे नाव काँग्रेस मधून आले नाही.
ब्रम्हपुरी मध्ये वडेट्टीवार यांचाच वर चष्मा : -
ब्रह्मपुरीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शिवाय दुसरे नाव नाही.त्यांची कन्या शिवानी या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आहेत.लोकसभा निवडणुकीत वडेट्टीवार यांनी मुली शिवाय अन्य नावाचा उमेदवारीसाठी आग्रह धरला नव्हता.
आम्ही स्वप्ने बघायची की नाही ?
बल्लारपूर व चंद्रपूर मतदारसंघांतूनही सातत्याने रजकीय कुटुंबाशी संबंधितच नावे समोर येत आहेत.त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला यंदाही या दोन्ही मतदारसंघांतून संधी मिळणे कठीणच आहे. यामुळे आम्ही निवडणुका लढण्याचे व खासदार - आमदार होण्याची केवळ स्वप्नेच बघायची का, असा प्रश्न कार्यकर्त्यां मधून उपस्थित होत आहे.
मुस्लीम,अल्पसंख्याक समाजात नाराजी : -
सामान्य कार्यकर्त्यां सोबतच मुस्लीम व अल्पसंख्याक समाजावर काँग्रेस पक्षाने सातत्याने अन्याय केला,असा आरोप पक्षातील या समाजाचे पदाधिकारी करीत आहेत.माजी खासदार अब्दुल शफी यांच्यानंतर काँग्रेस पक्षाने कधीच मुस्लीम समाजाचा उमेदवार दिला नाही.
मुस्लीम व अल्पसंख्याक समाजाची भरघोस मते घ्यायची, मात्र या समाजांना चंद्रपूर वगळता इतर क्षेत्रातून उमेदवारी द्यायची नाही, असेच काँग्रेसचे धोरण राहिले आहे. विद्यमान काँग्रेस खासदारांनी अल्पसंख्याक समाजाला सातत्याने टार्गेट केले आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही समाज काँग्रेसपासून दुरावण्याची शक्यता आहे.