आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ; मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल.
★ मुलचेरा तालुक्यातील शेतात गळफास घेऊन प्रेमी युगुल आत्महत्या प्रकरण.
एस.के.24 तास
गडचिरोली : प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथे 6 ऑक्टोबर ला उजेडात आली होती.
या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
जयदेब समीरण मंडल वय,20 वर्ष रा.लक्ष्मीपूर,अमेला अमित रॉय वय,18 वर्ष रा.विजयनगर यांच्यात प्रेमसंबंध होते. 5 ऑक्टोबर ला दोघेही मध्यरात्री घरातून गायब झाले होते. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ते आढळले नाहीत.लक्ष्मीपूर शिवारात एका शेतकऱ्याच्या झोपडीत या दोघांचे एकाच दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळले. दरम्यान, या घटनेची माहिती अमेला हिचे वडील अमित अनिल रॉय वय,42 वर्ष यांना समजली.
त्यानंतर दुपार पासून ते मोबाइल बंद करुन गायब झाले होते.नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नव्हते.अखेर मुलचेरा ठाण्यात ते बेपत्ता असल्याची नोंद केली. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता त्यांचे शेवटचे लोकेशन गावालगतच्या जंगलात आढळले.
अखेर दिनांक,7 रोजी सकाळी त्यांचा मृतदेह जंगलात एका झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.पो.नि.महेश विधाते यांनी घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.
मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पाऊल : -
दरम्यान, अमित रॉय हे शेती व्यवसाय करत. शांत व संयमी म्हणून ते परिचित होते. मुलीने प्रियकरासोबत आत्महत्या केल्याची बातमी कानावर पडल्यापासून ते अस्वस्थ होते. यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
दोन वर्षांपासून प्रेमसंबंध :-
अमेला अमित रॉय ही ही बारावीत शिकत होती, जयदेब मिलन मंडल हा बारावी उत्तीर्ण असून त्यानंतर त्याने शिक्षण सोडले होते. दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते, अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे. विजयनगर ते लक्ष्मीपूर या दोन गावातील अंतर जवळपास ५ ते ६ किलोमीटर असून या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट : -
युवक व युवती हे दोघेही एकाच जातीचे आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण समोर आले नाही. त्यांच्या प्रेमाला कोणाचा विरोध होता का, त्यांचा कोणाशी वाद झाला होता का, या सर्व बाबी पडताळण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.