6 विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती दरम्यान ; तुम्हाला ओळखतो,बायोडाटा व फाईल द्या ‌अन् निघा ; काँग्रेसमध्ये मुलाखतीचा फार्स.

6 विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती दरम्यानतुम्हाला ओळखतो,बायोडाटा व फाईल द्या ‌अन् निघा ; काँग्रेसमध्ये मुलाखतीचा फार्स.


एस.के.24 तास


चंद्रपूर : जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, ब्रम्हपुरी, चिमूर व वरोरा या सहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती बल्लारपूर मार्गावरील काँग्रेस इंटक भवन येथे मंगळवारी शांततेत पार पडल्या. 


प्रदेश काँग्रेसने या मुलाखती घेण्यासाठी निरीक्षक म्हणून आमदार ॲड.अभिजित वंजारी यांच्याकडे जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार नियोजित वेळ सकाळी अकरा वाजता मुलाखतीला सुरुवात झाली.या मुलाखती घेताना निरीक्षक आमदार ॲड.वंजारी यांच्या आजूबाजूला काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे व खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या.त्यामुळे बहुसंख्य इच्छुकांनी मुलाखतींचा हा फार्स आहे या शब्दात नाराजी व्यक्त केली.


राजुरा विधानसभेतून बाजार समिती संचालक उमाकांत धांडे यांनी उमेदवारी मागितली आहे. तेथील विद्यमान आमदार सुभाष धोटे आहे. दरम्यान धोटेच मुलाखतीला हजर असल्याने धांडे यांना मोकळ्यापणाने मत व्यक्त करता आले नाही.


हीच अवस्था बल्लारपूर येथून विधानसभा लढण्यास इच्छुक डॉ.अभिलाषा गावतुरे,नंदू नागरकर,घनश्याम मुलचंदानी,संतोष रावत, डॉ. संजय घाटे,बंडू धोतरे यांची झाली. 


आम्ही तुम्हाला ओळखतो, तुमच्या कार्याची माहिती आहे बायोडाटा द्या आणि निघा या चार शब्दाशिवाय पाचवा शब्द ॲड.वंजारी यांच्या तोंडून निघाला नाही,त्यामुळे हा फार्स नाही तर काय अशी प्रतिक्रिया तेथे उपस्थित इच्छुक उमेदवार व समर्थकांच्या तोंडी होती. 


विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेसने निरीक्षक व जिल्हाध्यक्षांना पाठविलेल्या यादीत पक्षाकडे २० हजार रुपये भरून उमेदवारी मागणाऱ्या अनेक इच्छुकांच्या नावांचा समावेश नव्हता. ही यादी दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमावर सार्वत्रिक होताच २० हजार भरून देखील मुलाखतीच्या यादीत नाव न आल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


दरम्यान,सोमवारी सायंकाळी विधानसभा लढण्यास इच्छुक सर्वांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे काही प्रमाणात नाराजी कमी झाली. वरोरा मतदारसंघातून डॉ. चेतन खुटेमाटे


खासदार धानोरकर यांचे बंधू प्रविण काकडे व दिर अनिल धानोरकर,डॉ.आसावरी व डॉ. विजय देवतळे या दाम्पत्यांनी मुलाखत दिली.विशेष म्हणजे अनिल धानोरकर डेंग्यूमुळे नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.ते केवळ मुलाखत देण्यासाठी आले आणि निघून गेले. 


चंद्रपूर विधानसभेसाठी प्रविण पडवेकर, राजु झोडे, डॉ.मिलिंद कांबळे,अनु दहेगावकर यांनी मुलाखती दिल्या.तर चिमूर येथून डॉ.सतिश वारजूकर, धनराज मुंगले यांनी मुलाखत दिली. 


ब्रम्हपुरी या विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात उमेदवार म्हणून त्यांचे एकमेव नाव आहे. वरोरा विधानसभा मतदारसंघातून दिनेश चोखारे व सुनीता लोढीया यांनी मुलाखती दिल्या.


काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी प्रदेश काँग्रेसकडे पाठविलेल्या व प्रदेश काँग्रेसने निरीक्षक आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्याकडे पाठविलेल्या यादीतून बहुसंख्य इच्छुकांची नावेच उडविण्यात आल्याने घडल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. मात्र अशाही स्थितीत कुणी नाराज होवू नये म्हणून सर्वांच्याच मुलाखती घेण्यात आल्या.

आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. वेळेत फार्म भरू शकले नाही परंतु ज्यांची लढण्याची इच्छा आहे अशांकडूनही फार्म भरून घेतले व त्यांच्याही मुलाखती घेतल्या. मुलाखतीत विविध बाबींचीही माहिती उमेदवारांकडून जाणून घेतली. – आमदार ॲड.अभिजित वंजारी, निरीक्षक, चंद्रपूर जिल्हा


उच्च विद्याविभूषित उमेदवार द्या : - 


भद्रावती तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या काही माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या परिवारात उमेदवारी देवू नका, सर्वसामान्य, उच्च विद्याविभूषित उमेदवार द्या अशी मागणी खासदार राहुल गांधी, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ई मेल पाठवून तथा निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. या निवेदनाची एक प्रत निरीक्षक आमदार अभिजित वंजारी यांनाही देण्यात आली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !