गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात नक्षलवादी व जवानांत झालेल्या जोरदार चकमकीत 5 नक्षलवादी ठार. ★ चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात नक्षलवादी व जवानांत झालेल्या जोरदार चकमकीत 5 नक्षलवादी ठार.


★ चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक !


भामरागड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना २१ ऑक्टोबर ला यश आले.छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात नक्षलवादी व जवानांत झालेल्या जोरदार चकमकीत पाच नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले.चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.


छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये २१ ऑक्टोबरला पहाटे चकमक सुरु झाली. नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली.


 यावेळी एक जवानही जखमी झाला आहे. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मृत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह देखील गडचिरोली येथे आणले आहेत.त्यांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.


गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे नक्षल्यांना जबर हादरा बसला आहे. अनेक जहाल नक्षलवादी चकमकीत ठार झाले तर काहींनी शरणागती पत्करली. त्यामुळे माओवादी चळवळ खिळखिळी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करु शकतात, ही शक्यता गृहित धरुन पोलीस सतर्क आहेत.

घनदाट जंगलात आश्रय : - 


नक्षलवाद्यांविरुध्द महाराष्ट्रासह छत्तीसगड पोलिसांनी ही आक्रमकपणे मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्षली सैरभैर झाले आहेत.संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या काहींना अटक झाली.


 तर काही चकमकीत ठार झाले. त्यामुळे ही चळवळ आता नेतृत्वहीन होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील नक्षली सीमावर्ती भागातील घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन गडचिरोलीत घुसखोरी करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.


शोध मोहीम सुरू आहे : - 


कोपर्शी जंगलात पहाटे सहा वाजेपासून जवान व नक्षल्यांत चकमक सुरु झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत ही चकमक सुरुच होती.त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. परिसरात झडती घेतल्यानंतर आतापर्यंत पाच नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले आहेत.यात मृत नक्षल्यांची संख्या वाढू शकते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मोठा फौजफाटा तैनात : - 

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अपर अधीक्षक यतीश देशमुख , एम .रमेश यांच्या नेतृत्वात सी - ६० पथकाच्या २२ तुकड्या व सीआरपीएफ च्या शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्या या कोपर्शी जंगलात पाठविण्यात आल्या. 


 जंगलात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !