निवडणुका लांबल्याने विकासकामांना खीळ ; अनेक कामे रखडले.
★ अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष.
एस.के.24 तास
सावली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प झाली आहेत.शेतकऱ्यांच्या वाडीवस्तीवर जाणारे छोटछोटे रस्ते,रस्त्यांवर मुरूम टाकणे,पथदिवे लावणे,सोलर दिवे लावणे,कुट्टी मशीन,शिलाई मशीन,सायकल वाटप अशी अनेक प्रकारची कामे बंद आहेत. या कामांसाठी नेमका कोणाकडे पाठपुरावा करायचा,असा प्रश्न ग्रामीण भागात निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात उतरतो.या निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणात कार्यकर्त्यांची एन्ट्री होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे, तर मिनी आमदारकी म्हणून पाहिलं जातं.मात्र, निवडणुकाच बंद असल्याने सर्वसामान्य माणूस वंचित राहात आहे. त्यामुळे याकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
समितीच्या निवडणुका न घेतल्याने सरपंच, उपसरपंचासह सदस्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा कणाच मोडला आहे.ग्रामसेवकाला वेळ नाही कारण ते चार गावांना जोडलेले आहेत.त्यांच्या तालावर पदाधिकाऱ्यांना नाचावे लागत आहे.जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांकडे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांना संपर्क करून कामे करून घेता येत होती.ही सिस्टीमच बंद असल्यामुळे गावांचे नुकसान होत आहे.
अधिकारी काम करत नाहीत, इंजिनिअर गावात येत नाहीत,त्यामुळे अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक पातळीवर शासकीय अधिकारी, कर्मचारीही विकास कामांकडेही लक्ष देत नाहीत जिल्हा परिषद,पंचायत समिती यांचा कार्यकाळ संपला आहे.या संस्थांच्य निवडणुकीसाठी कोणत्याही प्रकारच हालचाल सुरू नाही.
जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका अनेक दिवसांपासून लांबल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे.स्थानिक पातळीवर कोणतीही विकासकामे होताना दिसत नाहीत. प्रशासक काळात अधिकारी कर्मचारी लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र असून प्रशासनावर वचक राहिलेला नाही. निवडणुका न घेतल्याने ग्रामीण जनतेवर अन्याय होत आहे. - विजय कोरेवार माजी सभापती,पं.स.सावली