निसर्गाने पिकवलं आणि पुराणं नासवलं.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,११/०९/२४ ऐन निसावनीच्या तोंडावर आलेल्या धानाला फक्त एका पाण्याची गरज होती.निसर्गाने शेतकऱ्यांची तीही गरज पूर्ण केली. धो धो पाऊस पडला शेतामध्ये जमा झाला आणि शेतातील हलके धान पीक निसऊ लागले, काही गर्भात आहेत, तर काही काळी वरती आहेत.शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता परंतु.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्दधरण क्षेत्रात व मध्य प्रदेशात अति पाऊस पडत असल्यामुळे गोसे खुर्द धरणाचे ३३ दरवाजे जवळपास दोन मीटरने उचलण्यात आल्यामुळे पाण्याच्या वाढलेल्या विसर्गामुळे पिंपळगाव भोसले, अ-हेरनवरगाव येथे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गावात आणि शेतात पुराचे पाणी मोठ्या वेगाने वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला चांगल्या उत्पन्नाचा धानाचा व इतर पिकाचा घास मानवनिर्मित पुराने हिसकावून नेला.
नुकत्याच आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर धानाची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे . धान पिकाबरोबरच भाजीपाला, सोयाबीन,तुरी यासारखी पिके सुद्धा पुराच्या पाण्यात बुडलेली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची कंबरच मोडल्यासारखी झाली आहे.
शासनाने त्वरित पूरग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहाय्य करावे अशी पिंपळगाव,अ-हेरनवरगाव वाशीय जनतेची मागणी आहे.