राजकीय भूलथापांना बळी न पडता,समाजातील बांधवांसाठी काम करा. - प्रतिभाताई धानोरकर,खासदार चंद्रपूर लोकसभा क्षेत्र
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०८/०९/२४ कुणबी समाज शेतीवर आधारित समाज आहे. कुणबी समाजातील अधिकांश बांधव हे शेतकरी आहेत. सद्यस्थितीत हा शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेलाआहे. अशाही परिस्थितीत कुणबी समाजाच्या बांधवानी एकत्र येत या कार्यक्रमात हजेरी लावली ही निश्चितच आनंदाची अभिमानाचीआणि एकतेची पर्वणी आहे.
कुणबी समाज या विज्ञानवादी युगात हळूहळू जागरुक होत आहे.हा मेळावा घेतल्यामुळे अनेकांच्या झोपा उडाल्या. अशा पद्धतीने कुणबी समाजाने आपले कार्य चालू ठेवले पाहिजे.
" जेवढी ज्याची टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदार " या तत्त्वा वर समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. आपला समाज हा भोळा समाज आहे, राजकीय नेत्यानी चार-पाच कोटीची कामे दिली की आपल्या समाजातील नेतृत्व करणारे लोक त्यांचे बळी पडतात.परंतु, कोणत्याही राजकीय नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाला व भूलथापांना बळी न पडता, राजकीय पक्षाचा विचार न करता केवळ समाजाचा माणूस म्हणून आपल्या समाजातील बांधवांनी पुढे येऊन आपल्या समाजातील बांधवांची मदत केली पाहिजे.असे प्रतिपादन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
त्या कुणबी समाजाच्या वतीने आयोजित महा अधिवेशन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होत्या.अखिल कुणबी समाज, कुणबी समाज संघर्ष समिती, कुणबी महिला मंडळ ब्रह्मपुरी च्या वतीने महाअधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दामोधर मिसार संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे होते.
उद्घाटक म्हणून प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर लोकसभा क्षेत्र, प्रमुख अतिथी डॉ. परिणय फुके आमदार विधान परिषद तथा माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदिप वादाफडे कुणबी उद्योजक, अध्यक्ष ओबीसी आरक्षण परिषद यवतमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून ऋषी राऊत, अर्जुनजी भोयर , संतोष रडके, लेमराम लडके,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलन व माल्यार्पन करून झाली.
उद्घाटनिय भाषणात प्रतिभाताई धानोरकर पुढे बोलताना म्हणाल्या की, राजकीय नेत्यानी चार-पाच कोटीची कामे दिली की आपल्या समाजातील नेतृत्व करणारे लोक त्यांचे बळी पडतात. परंतु यापुढे असे होता कामा नये तुम्ही समाजाची काम करा. समाजाचे प्रतिनिधित्व करायल समाजातून सर्वश्रुत नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे.कारण, कुणबी समाजाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. मी कुणबी समाजाच्या बळावर निवडणूक निवडून आले.
जेव्हा समाज अडचणीत असेल, तेव्हा मला आवाज द्या, मी प्रतिसाद देईन.ओबीसींची जनगणना झाली पाहिजे ओबीसी मंडळात माझी निवड झाली. या देशात पशुपक्षी यांची जनगणना होते परंतु माणसाची जनगणना होत नाही. मी ओबीसी जनगणना झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहे.शासनाने लाडकी बहिणींची योजना अमलात आणली.परंतु चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मायबाप,बहिणींनी आणि बंधूंनी लाडक्या बहिणीची योजना लोकसभा निवडणुकीतच राबविली. समाज घडविणारी समाज चालविणारी जागृत शक्ती महिला आहे.
आपल्या समाजाच्या महिलांना मदत करा. त्या सामाजिक नाही तर राजकीय नेतृत्वात सुद्धा बदल घडवू शकतात. असे मनोगत व्यक्त केले.डॉ.परिणय फुके यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, ओबीसींचे ४८ जीआर पैकी ३८ जीआर ते माझ्या पाठपुरवठ्यामूळे निघाले. मागील अर्थसंकल्पात जात न्याय जनगणनेबाबत तरतूद केली नाही त्यामुळे २०१९ ला जनगणना पूर्णपणे झाली नाही. येत्या काळात कुणबी समाजाचे कार्यक्रम कुणबी समाजाच्या हॉलमध्ये झाले पाहिजेत.
कुणबी समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन समोर आले पाहिजे चांगले शिक्षण घेतले पाहिजे संघटित झाले पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. सोबतच आपण आपल्या समाजातील व्यवसायिकांना मदत केली पाहिजे. आपले माणसे उभे करायला शिकले पाहिजे. कुणबी समाज हा विखुरलेला समाज आहे, त्यामुळे याचा फायदा अल्पसंख्यांक असलेला समाज नेहमी घेत असतो. त्यामुळे समाजाची दिशाभूल होता कामा नये. कुणबी समाजाची वज्रमूठ बांधायची आहे.
कुणबी समाजाच्या प्रतिनिधिला विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी मी माझ्या पक्षश्रेष्ठीकडे हा विचार पोहोचविणार आहे. असे विचार डॉ. परिनय फुके यांनी व्यक्त केले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदीप वादाफडे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, कुणबी समाज असे शेतीवर आधारित समाज आहे. शेतीही तुकड्यात विभागणारी असल्यामुळे शेती हा तोट्याचा धंदा आहे. शेतकऱ्याच्या पोरांनी व्यवसाय केला पाहिजे. शासनाचे अनेक धोरण हे शेतकऱ्यांसाठी मारत आहेत.
शासनाने १००% शिक्षण शुल्क माप केल्यानंतरच शेतकऱ्यांची पोरं शिक्षण घेऊ शकतील. शासनाने १६ लाख करोड रुपये उद्योगपतींना माफ केले. परंतु, शेतकऱ्यांच्या पोरांची शुल्क माफ करू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. शासन ओबीसीची जनगणना करत नाही शासनाने ओबीसी जनगणने साठी बजेटमध्ये तरतूद करावी. यापुढे शेतकऱ्यांच्या पोरांनी उद्योग व्यवसायांचा अभ्यास करून स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय सुरू करावे असे प्रतिपादन केले.
अध्यक्ष भाषणात दामोदर मिसार यांनी कुणबी समाजाने एकजूट होऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे. कुणबी समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठविणे गरजेचे आहे. यापुढे रडत न बसता लढले पाहिजे.कुणबी समाजाने प्रत्येक क्षेत्र काबीज करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन दामोधर मिसार यांनी केले.
यावेळी कुणबी समाजाचे जगद्गुरु तुकोबाराया यांच्या पुतळ्याचे अनावरण कुणबी समाज कार्यालय हत्तीगोटा, कहाली खंडाळा रोड येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा.ज्योती दुपारे व प्रा.दामोधर शिंगाडे यांनी प्रस्तावना कृष्णा सहारे तर आभार कॉम्रेड विनोद झोडगे यांनी मानले.कार्यक्रमाला नागपूर ,चंद्रपूर ,भंडारा ,गडचिरोली आणि जिल्ह्यातील कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.