अहेरी तालुक्यातील कोपर्शी च्या घनदाट जंगलांमध्ये २० मे २०१९ ची घटना.
★ पोलीस कारवाई वर प्रश्न चिन्ह.
एस.के.24 तास
अहेरी : पोलीस नोंदणी मधील नावांच्या व्यक्तींना नक्षल चकमकीत गोळीबार करणारे आरोपी ठरवण्याची किमया गडचिरोली पोलिसांनी केली आहे,असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिलेची तिच्यावरील आरोपातून निर्दोष सुटका केली.
नक्षलवाद्यांसोबत चकमकीची पोलिसांनी सांगितलेली कथा विश्वसनीय नसल्याचे परखड मत नोंदवत याआधी सत्र न्यायालयाने आरोपी महिलेला दिलेली शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली.न्या.गोविंद सानप यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
अहेरी तालुक्यातील कोपर्शी च्या घनदाट जंगलांमध्ये २० मे २०१९ रोजी नक्षलवादी विरोधी पथक गस्त घालत होते.या पथकात ६० शस्त्रधारी पोलिसांचा समावेश होता. पोलिसांनी केलेल्या आरोपानुसार,गस्त घालताना सकाळी नक्षलवाद्यांच्या एका गटाने बेधुंद गोळीबार केला.
पोलिसांनीही त्याला गोळीबार करून उत्तर दिले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी पळ काढला.पोलिसांनी ११ जानेवारी २०२० रोजी या प्रकरणी याचिकाकर्ती आरोपी,पार्वती शंकर मडावी हिला अटक केली.पार्वती २०१७ मधील एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होती.
नक्षल चकमकीच्या या प्रकरणात केवळ पार्वतीला अटक झाली आणि तिच्यावर खटला चालवण्यात आला.तिला अडकवण्यात येत असल्याचा युक्तिवाद पार्वतीने केला.गडचिरोली सत्र न्यायालयाने १६ फेब्रुवारी २०२१ रोजी तिला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली.सत्र न्यायालयाच्या या निर्णया विरोधात पार्वतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
सत्र न्यायालयाने निर्णय देताना अनेक महत्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष केले असल्याचे मत नोंदवित सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला.याचिकाकर्ती महिलाच्या वतीने ॲड.एच.पी.लिंगायत यांनी बाजू मांडली. राज्य शासनाच्या वतीने ॲड.एच.एस.धांडे यांनी युक्तिवाद केला.
पोलीस कारवाई वर प्रश्न चिन्ह : -
नक्षवाद्यांवर जोरदार गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला.या गोळीबारात ना पोलिसांकडून,ना नक्षलवाद्यांकडून कुणीही जखमी झाले किंवा कुणाचा मृत्यू झाला.घटनास्थळावरून बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या नाहीत. चकमक झालेल्या परिसरातील झाडांवर देखील गोळीबाराची खूण सापडली नाही.
पोलिसांमध्ये आणि नक्षलवाद्यांमध्ये किती अंतर होते ? ६० शस्त्रधारी पोलीस होते आणि त्यांना आरोपी महिला दिसली तर त्यांनी तिच्यावर गोळीबार केला का नाही,असे विविध सवाल न्यायालयाने उपस्थित केले.
बेधुंद गोळीबार सुरू असताना नक्षलवादी समोर आले आणि पोलिसांनी त्यांना बघितले ही कथाच अविश्वसनीय असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि आरोपी महिलेची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.