गावकऱ्यांनी घातला सरपंच, ग्रामसेविकेच्या खुर्चीला चपलांचा हार ; उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम.
एस.के.24 तास
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील कोजबी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सोनपूर गावातील नागरिकांनी गावात मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण हटविण्यासह इतर मागण्यांसाठी 20 सप्टेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. परंतू आठ दिवस होऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी शुक्रवारी सरपंच-उपसरपंच आणि ग्रामसेविकेच्या खुर्च्यांना चपला-जोड्यांचा हार घालून ग्रापपंचायत प्रशासनाचा निषेध केला.
सोनपूर पेसा समितीचे पदाधिकारी आणि गावकऱ्यांच्या वतीने सोनपूरच्या आबादी जागेवरील अतिक्रमण हटविण्यासह विविध मुद्द्यांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत साखळी आंदोलन सुरू आहे. तत्पूर्वी पेसा समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने सात-आठ महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासन व वरिष्ठ कार्यालयांना निवेदने देऊन मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती केली होती.
सदर मागण्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने या मागण्यांवर ग्राम पंचायत प्रशासनाने तोडगा काढावा म्हणून पेसा समितीचे पदाधिकारी व सोनपूर येथील गावकऱ्यांनी 6 जून 2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
त्या आंदोलनात ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी हमीपत्र देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु चार महिन्यांचा कालावधी उलटूनसुद्धा एकही मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे 20 सप्टेंबरपासून गावकऱ्यांनी कोजबी ग्रामपंचायतसमोर पुन्हा बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली.
आठ दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन कोणतीच भूमिका का घेत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतमधील कायदेशिर बाबींची पूर्तता करण्याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशिरपणे अतिक्रमण करणाऱ्यांना प्रशासनाकडून पाठीशी घातले जात असल्याने ग्रामपंचायतच्या यंत्रणेवर गावकऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे.