आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षा कडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो - मी निवडणूक लढणार ; अहेरी चे भाजप नेते माजी राज्यमंत्री यांचे आव्हान.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षा कडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो - मी निवडणूक लढणार ; अहेरी चे भाजप नेते माजी राज्यमंत्री यांचे आव्हान. 


एस.के.24 तास


अहेरी : आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो, मी निवडणूक लढणार,असे जाहीर करून भाजप नेते माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्वपक्षालाच आव्हान दिल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. 


अम्ब्रीशराव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा यांचे पुतणे असून समाज माध्यमावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या २५ उमेदवारांची कथित यादी सार्वत्रिक झाल्यानंतर अम्ब्रीशराव यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हे वक्तव्य केले.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. धर्मरावबाबा यांच्या मुलीने त्यांच्याविरोधात बंड केल्याने अहेरी विधानसभेतील राजकीय घडामोडीची राज्यात चर्चा आहे.मंत्री धर्मरावबाबा आणि त्यांचे पुतणे अम्ब्रीशराव यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट महायुतीत सामील झाला. 


यात धर्मरावबाबा यांचादेखील समावेश होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती कडून मंत्री आत्राम यांना उमेदवारी मिळणार अशी शक्यता आहे.त्यामुळे अम्ब्रीशराव यांच्या गोटात अस्वस्थता असून त्यांनी गेल्या काही दिवसापासून स्वतंत्रपणे राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 


अशातच समाज माध्यमावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य २५ उमेदवारांची यादी सार्वत्रिक झाली. यावर अम्ब्रीशराव यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो,आपण निवडणूक लढणार अशी भूमिका घेतल्याने महायुतीतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.


एवढ्यावरच न थांबता त्यांनी काका धर्मरावबाबा यांच्यावर टीका करणेही सुरू केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्व महायुती म्हणून लढणार असल्याचे जाहीर करत असले तरी त्यांना पक्षातूनच आव्हान मिळत असल्याचे चित्र आहे. यावर महायुतीतील नेते काय भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसकडून तक्रार : - 


एकीकडे भाजप नेतृत्व आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून लढणार असे जाहीर करत असताना जागावाटपाआधी त्यांच्याच पक्षातील नेते मित्रपक्षांतील नेत्यांवर जाहीर टीका करत असल्याने महायुतीत बंडाचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे यावर फडणवीस काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !