नव्याने प्रवेशित असंख्य कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितल्याने बहुसंख्य जुने कार्यकर्ते नाराज ; चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस मध्ये जुने विरुद्ध नवे संघर्ष. ★ नवख्यांना थेट विधानसभेची उमेदवारी द्यायची ; हा कुठला न्याय.

नव्याने प्रवेशित असंख्य कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितल्याने बहुसंख्य जुने कार्यकर्ते नाराज ; चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस मध्ये जुने विरुद्ध नवे संघर्ष.


नवख्यांना थेट विधानसभेची उमेदवारी द्यायची ; हा कुठला न्याय.


राजेंद्र वाढई !! उपसंपादक !!


चंद्रपूर : जिल्हा काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच जुने विरुद्ध नवे संघर्ष वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.सोमवारी येथे आयोजित बैठकीत नव्याने पक्षात आलेल्यांविरोधात कार्यकर्त्यांनी नाराजी जाहीर केली.उमेदवारीच्या आशेने काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांविरोधात जुनेजाणते निष्ठावंत कार्यकर्ते उभे ठाकल्याचे चित्र आहे.


प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आशीर्वादाने बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या डॉ.अभिलाषा गावतुरे काँग्रेस पक्षात राहूनही भूमिपुत्र ब्रिगेडचे काम करीत आहेत.चार महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेल्या गावतुरे उमेदवारी मागत आहेत, त्यांनी एकतर काँग्रेसचे काम करावे किंवा भूमिपुत्र ब्रिगडचे,असा आक्षेप बल्लारपुरातील कार्यकर्त्यांनी घेत आढावा बैठकीत थेट काँग्रेस श्रेष्ठींकडे तक्रार केली.


बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जुने कार्यकर्ते घनश्याम मुलचंदानी यांनी उमेदवारी मागितली आहे, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. रावत व मुलचंदानी या दोघांची नावे चर्चेत असतानाच गावतुरे यांचेही नाव अचानक समोर आले. यावर मुलचंदानी यांनी जुन्या कार्यकर्त्यांना सोडून नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जात असल्याबद्दल आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. 


स्थानिक पातळीवर भाजपविरोधात लढा देऊन आम्ही काँग्रेस पक्ष जिवंत ठेवला आणि आता नवखे नेते थेट उमेदवारीवर दावा करतात, हा जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे,अशी भूमिका त्यांनी मांडली.हीच व्यथा रावत यांच्या वतीने मूल तालुका काँग्रेस अध्यक्षांनी देखील प्रदेशाध्यक्षांसमोर मांडली.


चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाबाबतही अशाच तक्रारी समोर आल्या.जुन्या आणि ज्येष्ठ नेत्याला नवीन कार्यकर्ते मानसन्मान देत नाहीत, अर्वाच्य शब्दात बोलतात, धक्काबुक्की करतात, हा मुद्दादेखील उपस्थित झाला. जिल्हाध्यक्षांसोबत मोठ्या आवाजात बोलतात,ज्येष्ठांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही नवीन नेते आणि कार्यकर्ते करतात,अशा शब्दात जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. 


वरोरा व चिमूर या दोन विधानसभा मतदारसंघातूनही नवीन नावे समोर येत असल्याबद्दल निष्ठावंत काँग्रेसजणांनी नाराजीचा सूर आवळला.प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही निलंबनाची कारवाई होते,ज्यांचा पक्षाशी काही संबंध नाही,त्यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत येतात, हे योग्य नाही,अशा शब्दात नाराजी व्यक्त झाली.


हा कुठला न्याय ?


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेशित असंख्य कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितल्याने बहुसंख्य जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.ही नाराजी आढावा बैठकीत स्पष्टपणे दिसून आली. नवख्यांना थेट विधानसभेची उमेदवारी द्यायची, हा कुठला न्याय आहे,असा प्रश्न अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी थेट प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारला.


यावर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पक्ष विस्तारासाठी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले पाहिजे,असे सांगत त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !