अमरदीप लोखंडे : सहसंपादक
ब्रह्मपुरी : २७/०९/२४ अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची लगबग सुरू असताना सर्वच पक्षाने आपापले उमेदवार चाचपन्याची व उभे करण्याची धडपड सुरू केलेली आहे. त्यातच ब्रह्मपुरी विधानसभेची महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी विद्यमान आमदार श्री विजय वडेट्टीवार यांना जाहीर झालेली असून महायुतीचा तिढा मात्र सुटलेला नाही.
त्यातच वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवाराची चाचपणी पक्ष करीत असून रिपब्लिकन युतीमधून एकीकृत चे उमेदवार म्हणून सदोदित तरुणांच्या संपर्कात असणारे, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ,पत्रकारितेतून प्रसिद्धीच्या झोतात असणारे उच्चशिक्षित , कर्तव्यनिष्ठ, आंबेडकरी विचारधारेचे पाईक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून प्रा. प्रशांत डांगे यांनी उमेदवारी लढवावी म्हणून अनेक गावांमधून प्रतिसाद मिळतो आहे.
प्रा.प्रशांत डांगे हे दैनिक महासागर या वृत्तपत्राचे पुरस्कार प्राप्त पत्रकार असून विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मग विविध समाजाचे वधू वर परिचय मेळावे असोत, रक्तदान शिबिरे, सामाजिक प्रश्नांवरील मोर्चे, आंदोलने, उपोषणे, विविध जातींवरील महिलांवर होणारे अन्याय ,शेतकऱ्यांचे प्रश्न, जिल्हा निर्मितीचा प्रश्न, विद्यार्थ्यांचे समस्या, त्यांचा रोजगार, शिष्यवृत्तीचा प्रश्न, आणि सामाजिक बांधिलकी म्हणून सगळ्यांच्या सुखदुःखातील प्रसंग आदींना उपस्थित राहून त्यांनी जन माणसाच्या हृदयात खोलवर पाऊले रोवलेली आहेत.
त्यामुळेच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील बऱ्याचशा गावांमध्ये रिपब्लिकन पक्ष एकीकृत तर्फे उमेदवारी लढविण्याच्या संबंधाने आढावा घेतला असता प्रा. प्रशांत डांगे यांच्या नावाला भरभरून प्रतिसाद मिळत असून त्यांनी उमेदवारी लढवावी. त्याकरता आम्ही रिपब्लिकन जनता लोकवर्गणीतून व निश्चितपणे मतदान करून त्यांना विधानसभेतील प्रतिनिधित्व बहाल करू अशी प्रतिक्रिया गावागावांमधून येताना दिसत आहे.
एकतर या विधानसभा क्षेत्रामध्ये यापूर्वी कधीच रिपब्लिकन पक्षाला यश मिळाले नसले तरी कोणाला विजयी करायचे आणि कुणाला पाडायचे याचे सर्व तंत्र रिपब्लिकन जनतेच्या हातात असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात या विधानसभा क्षेत्राचा पुनर्विस्तार होऊन मागासवर्गीयांसाठी हे क्षेत्र राखीव होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच रिपब्लिकन जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे चर्चिल्या जात आहे.