गडचिरोली येथील स्नेहनगर एकाच घरी दुसऱ्यांदा घरफोडी ; संतप्त चोरट्यांकडून साहित्याची मोडतोड.
एस.के.24 तास
गडचिरोली : भरगच्च लोकवस्ती असलेल्या गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरच्या स्नेहनगर परिसरात शनिवारच्या पहाटे (ता.28) चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून घरफोडी केली. पण घरमालकाने हुशारी केल्याने चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. विशेष म्हणजे याच घरात यापूर्वीही अशाच पद्धतीने घरफोडी होऊन चोरट्यांनी आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
स्नेहनगर येथे राहणारे मोहनदास मेश्राम यांची मुलगी मुंबईत राहते. ते काही दिवसांसाठी मुलीकडे मुंबईला गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर (शनिवारच्या पहाटे) त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी काही मिळण्याच्या आशेने आलमारी, दिवाण, पलंग आदींची मोडतोड करून साहित्य अस्ताव्यस्त केले.
पण त्यांच्या हाती काही लागले नाही.कारण पहिल्या चोरीमुळे सावध झालेल्या मेश्राम यांनी घरात कोणत्याही मौल्यवान वस्तू (दागिने) किंवा पैसै ठेवलेले नव्हते.त्यामुळे चिडलेल्या चोरट्यांनी घरातील साहित्याची मोडतोड करून ते अस्ताव्यस्त केले.
शनिवारी सकाळी मेश्राम यांच्याकडे काम करणारा युवक आला तेव्हा घरफोडी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने मेश्राम यांना कळविल्यानंतर गडचिरोली शहर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलिसांनी येऊन पाहणी करून तक्रार दाखल केली.