अहेरी तालुक्यातील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा ? ★ आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरत आहे का ? प्रशासनात दोन मत प्रवाह का ?

अहेरी तालुक्यातील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा ? 


★ आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरत आहे का ? प्रशासनात दोन मत प्रवाह का ?


सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!


अहेरी : दोन मृत मुलांना खांद्यावर घेऊन पायी जाणाऱ्या आई-वडिलांची चित्रफित समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. विरोधी पक्षासह सामान्य नागरिकांनीही पायाभूत सुविधांबद्दल सरकारला जाब विचारला.काहींनी आरोग्य विभागालाही धारेवर धरले. तर काहींनी या घटनेला अंधश्रद्धा कारणीभूत असल्याचेही म्हटले.


4 सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येत असलेल्या येर्रागड्डा या आदिवासी बहुल गावातील सहा आणि साडेतीन वर्षाच्या दोन भावंडांचा पत्तीगाव येथे मृत्यू झाला.तेथून रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने दोन्ही चिमुकल्यांना खांद्यावर घेत आई-वडिलांनी रुग्णालय गाठले. परंतु उशीर झाला होता. यानंतर समाजमाध्यमावर सार्वत्रिक झालेली चित्रफित देशात चर्चेचा विषय ठरली. गडचिरोली हे चित्र वारंवार का दिसून येत आहे. याबद्दल घेतलेला आढावा. 

" त्या "  दिवशी नेमके काय घडले ?


जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील येर्रागड्डा या गावी रमेश वेलादी हे आपल्या कुटुंबासह राहतात. घटनेच्या काही दिवसांपूर्वी त्यांचा ६ वर्षीय मोठा मुलगा बाजीराव याला ताप आला होता. जवळच असलेला जीमलगट्टा येथे बाजीराव याच्यावर उपचार करण्यात आले.


त्यानंतर वेलादी दाम्पत्य आपल्या मुलाला घेऊन घरी परतले. काही दिवस बरे वाटल्यानंतर बाजीराव याला पुन्हा ताप आल्याने वेलादी दाम्पत्याने रुग्णालयात न जाता दोन्ही मुलांना सोबत घेत जवळच असलेले पत्तीगाव गाठले. 


पतीगाव हे दोन्ही मुलांचे आजोळ आहे.तो पर्यंत साडेतीन वर्षीय लहान मुलगा दिनेश ठणठणीत होता.दरम्यान 4 सप्टेंबर ला सकाळी साडेदहा वाजता सुमारास काही तासाच्या अंतराने दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.जीमलगट्टा ते पत्तीगाव जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.सोबतच आदल्या दिवशी या भागात पाऊस झाल्याने रस्त्यावर चिखल होता.  


संध्याकाळ च्या सुमारास वेलादी दाम्पत्य दोन्ही मृत मुलांना खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने निघाले होते.जवळपास ५ किमी अंतर त्यांनी पायपीट केली.त्यानंतर दुचाकीने त्यांनी रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोन्ही भावंडे मृत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला.हे कळू शकले नाही. त्यांनी वेलादी दाम्पत्याला रुग्णवाहिकेतून सोडून देणार असे सांगितले. मात्र, त्यांनी डॉक्टरांचे ऐकून न घेता दुचाकीने गाव गाठले. 


मृत्यू बद्दल संशय व्यक्त का होतोय ? 


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव आणि दिनेश हे पत्तीगाव ला जाताना ठणठणीतच होते. बाजीराव याला थोडा ताप होता.दुसऱ्या दिवशी काही तासाच्या अंतराने दोघांचाही मृत्यू झाल्याने आरोग्य विभागही गोंधळात सापडला आहे. ३० ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या चमूने नियमित आरोग्य तपासणीसाठी रमेश वेलादी यांच्या घरी भेट दिली. तेव्हा आईव्यतिरिक्त कुणालाच आरोग्यविषयक तक्रार नव्हती. तसेच रक्त तपासणीत हिवतापाचा अहवाल नकरात्मक होता. 


घटनेनंतरही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी येर्रागड्डा येथे भेट देऊन माहिती घेतली व दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला.हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु काहींनी हे मृत्यू मांत्रिक किंवा पुजाऱ्याच्या चुकीच्या उपचारामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबद्दल प्रशासनातच दोन मतप्रवाह आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य काय ते पुढे येईल.

प्रशासनात दोन मत प्रवाह का ?


दोन मृत मुलांना खांद्यावर घेऊन पायी जाणाऱ्या आई-वडिलांची चित्रफित समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली.विरोधी पक्षासह सामान्य नागरिकांनीही पायाभूत सुविधांबद्दल सरकारला जाब विचारला. काहींनी आरोग्य विभागालाही धारेवर धरले. तर काहींनी या घटनेला अंधश्रद्धा कारणीभूत असल्याचेही म्हटले.या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद तसेच पोलीस विभागाने पुढाकार घेतला.दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. हे त्यांना ठामपणे सांगता आले नाही. 


याबद्दल उघडपणे कुणी बोलत नसले तरी प्रशासनातच दोन मतप्रवाह दिसून येत आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या दोन भावंडांना आजार होता. परंतु आई-वडिलांनी लक्ष न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर काही अधिकारी हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचे सांगतात. जिल्हा प्रशासनाने तर गावात जाऊन गावकऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाची शपथही दिली.परंतु मृत्यूच्या कारणांबद्दल कुणीही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही. 


अंधश्रद्धा कारणीभूत आहे काय ?


दक्षिण गडचिरोली हा प्रामुख्याने हिवताप प्रभावित भाग म्हणून ओळखला जातो.त्यामुळे दरवर्षी येथे हिवतापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात.सोबतच अधूनमधून डेंगूचेही रुग्ण आढळून येतात. सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. अशा गंभीर आजारी रुग्णांवर वेळेत औषध उपचार करणे गरजेचे असते. 


अनेक प्रकरणांमध्ये या भागातील रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात पोहोचतात.या परिसरात असलेले अंधश्रद्धेचे प्रमाण बघता अनेकदा रुग्णाचे नातेवाईक त्याला मांत्रिकाकडे घेऊन जात असल्याचे दिसून येते.आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचेही हेच म्हणणे असते. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्ण दगावतो.


पण सर्वच प्रकरणांमध्ये असे झालेले नाही. कित्येकदा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गंभीर आजारी रुग्णाला उपचारासाठी ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात पोहोचणे शक्य होत नाही. रस्त्यांमुळे देखील हीच समस्या उद्भवते.परिणामी रुग्णांचा जीव जातो. त्यामुळे सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्यानंतर प्रशासन अंधश्रद्धेकडे बोट दाखवतात,अशीही टीका अनेकदा होते.


आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरतेय का ?


गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, धानोरा, अहेरी भामरागड,एटापल्ली,सिरोंचा हे तालुके अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल म्हणून ओळखले जातात.या सर्व तालुक्यांना तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे या भागात नक्षल्यांचा वावर असतो. मात्र, मधल्या काळात पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवाद मोठ्या प्रमाणात आटोक्यात आलेला आहे. 


तरी पण दुर्गम भागातील अनेक गावांना जाण्यासाठी अद्याप रस्ते बनलेले नाही.या भागातील बहुतांश नदी नाल्यांवर पूल नाही.त्यामुळे या भागात आरोग्य सुविधा पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी येथील गंभीर आजारी रुग्णांना कधी खाटेची कावड बनवून आणावे लागते. तर कधी खांद्यावर घेऊन यावे लागते. 


पत्तीगाव प्रकरणातही पक्का रस्ता नसल्यामुळे दोन मृत भावंडांना आई-वडिलांनी खांद्यावर घेऊन रुग्णालय गाठले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेला केवळ आरोग्य विभागाच नव्हे तर अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि रिक्तपदे कारणीभूत असल्याचे जाणकार सांगतात. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !