गडचिरोली च्या आशा बावणे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित.
एस.के.24 तास
गडचिरोली : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या देशातील 15 परिचारिका आणि परिचारकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने काल नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला.यात महाराष्ट्रातून एकमेव व सध्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सहाय्यक अधिसेविका या पदावर कार्यरत,आशा बावणे यांना त्यांच्या 28 वर्षांच्या आरोग्य सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
एक लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा शल्य चिकित्सक माधुरी किलनाके यांनी आशा बावणे यांचे अभिनंदन केले आहे.
आशा बावणे यापूर्वी चंद्रपूर व त्यापूर्वी गडचिरोली येथेच परिचारिका पदावर कार्यरत होत्या. चंद्रपूर येथे कार्यरत असतांनाच त्यांचे नामांकन राष्ट्रपती पुरस्कारासाठी करण्यात आले होते. त्यांनी विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्यसेवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. श्रीमती बावणे यांनी डायरियाच्या प्रकोपावर नियंत्रण, हज यात्रेत आरोग्य सेवा, तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या लस मोहिमेचे विशेष कौतुक झाले.
दिल्ली येथील या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल,आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 1973 पासून देण्यात येतात. 2023 पर्यंत 614 परिचारिका आणि परिचारकांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित करण्यात आले आहे.