सरसंघचालकांच्या " त्या " वक्तव्याचा चंद्रपुरात जाहीर निषेध आंदोलन.
एस.के.24 तास
चंद्रपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी लोकमान्य टिळक यांनी शोधली असा चुकीचा इतिहास सांगणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या निषेधार्थ त्यांच्या गृह जिल्ह्यात चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले.
क्षत्रीय माळी समाज सेवा मंडळ,चंद्रपूर आणि संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बहुजन समता पर्व यांनी भागवत यांचा निषेध केला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत खोटी माहिती देणाऱ्यापासून सावध रहा, असेही सांगितले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुणे येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी लोकमान्य टिळक यांनी शोधली आहे, असे वक्तव्य केले होते.
भागवत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातच नवे तर संपूर्ण देशात टीकेची झोंड उठली आहे. बहुतांश वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा समता परिषदेचे अध्यक्ष, छगन भुजबळ,विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र अव्हाड यांनी भागवत यांना इतिहास माहीत नाही अथवा त्यांच्याकडून इतिहास पुसण्याचे काम सुरू आहे अशी टीका केली.
प्रत्यक्षात १९ फेब्रुवारी १८६९ ला रायगड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी किल्ल्यावर चढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेतला व परिसरात साफसफाई केली. देशातील आणि महाराष्ट्रातील लोकांना याची संपूर्ण माहिती आहे आणि त्याचे पुरावे देखील आहेत. १९ फेब्रुवारी १८७० पासून महात्मा ज्योतिबा फुले यांनी जयंती साजरी करण्यास सुरवात केलेली आहे. हे सर्वश्रुत असूनसुद्धा असे वक्तव्य मोहन भागवत यानी केले. खोटा इतिहास सांगण्याचा हा प्रकार योग्य नाही.
याच्या निषेधाकरिता गांधी चौकात क्षत्रीय माळी समाज सेवा मंडळ चंद्रपूर आणि संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बहुजन समता पर्व यांच्यावतीने भागवत यांचा निषेध नोंदविण्यात आला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुसून काढणारे मोहन भागवत यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे दिलीप चौधरी यांनी भाषण देत खरा इतिहास मांडला. नंदू नागरकर व दिलीप कांबले यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बबनराव फंड, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढ़िया अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.