चंद्रपूर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँग्रेस मध्ये आयारामांचा लोंढा वाढला ; निष्ठावंतांमध्ये प्रचंड अस्वस्थतता दिसून येत आहे.
★ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस पक्षात आयारामांची संख्या वाढली.
एस.के.24 तास
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये आयारामांचा लोंढा वाढला असून निष्ठावंतांमध्ये प्रचंड अस्वस्थतता दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस पक्षात आयारामांची संख्या वाढली आहे.परिणामी निष्ठावंतांची विधानसभा उमेदवारीत नावे मागे पडत आहेत.
राज्य आणि केंद्रीय नेत्यांकडून आयारामांना बळ मिळत असल्याने आम्ही आयुष्यभर सतरंज्यांच उचलायच्या का,असा प्रश्न निष्ठावंत विचारताहेत.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून निष्ठावंत धडपड करीत आहेत.झोडे यांना स्थानिक नेत्यांनी आशीर्वाद दिला आहे.यामुळे झोडे यांनी थेट शहरात कार्यालय सुरू केले.
डॉ.दिलीप कांबळे यांचा काँग्रेस पक्षाशी तसा संबंध नाही,त्यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.भाजपचे एक माजी नगसेवक देखील काँग्रेसने उमेदवारी दिली तर विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत.
वादग्रस्त सेवानिवृत्त पोलीस अधिकारी,सुधाकर अंभोरे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत.इंजि. गौतम नागदेवते देखील स्पर्धेत आहेत.या सर्वांचा काँग्रेस पक्षाशी काय संबंध, असा प्रश्न निष्ठावंतांच्या वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे.त्या प्रचारात गुंतल्या आहेत.डॉ.संजय घाटे देखील उमेदवारीची अपेक्षा करीत आहेत.
बंडू धोतरे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि बल्लारपूरातून उमेदवार मागितली आहे.डॉ.विश्वास झाडे देखील सक्रिय झाले आहेत.युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शंतनू धोटे बल्लारपुरातून इच्छुक आहेत. भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी वरोरा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे.
या शिवाय प्रा.विजय बदखल व डॉ. चेतन खुटेमाटे हेदेखील उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी ही उमेदवारी मागितली आहे.काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित झालेले डॉ. विजय देवतळे यांनी सुद्धा वरोरा विधानसभेतून उमेदवारी मागितली आहे.
तर विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका.
आयारामांकडून उमेदवारीसाठी सुरू असलेले प्रयत्न आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आयारामांना दिलेली संधी व आश्वासने,यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत.
हे निष्ठावंत उमेदवारी वाटपात अन्याय झाला तर विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नाही,अशी चर्चा आहे.