" योजनादूत बना, महिन्याला 10 हजार रुपये मिळवा ; शासन आणि नागरिकांमध्ये दुवा बनण्याची सुवर्ण संधी.
★ ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 सप्टेंबर पर्यंत.
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच प्रचार, प्रसिध्दी थेट नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील युवकांना शासन आणि नागरिकांमध्ये दुवा बनण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना शासनाकडून दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ साठी नोंदणी करावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील उमेदवारांकडून 13 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे.
मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष : 1) वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार. 2) शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर. 3) संगणक ज्ञान आवश्यक. 4) उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक. 5) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक. 6) उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.
योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे : 1) विहित नमुन्यातील "मुख्यमंत्री योजनादूत" कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज. 2) आधार कार्ड. 3) पदवी उत्तीर्ण असल्याबाबत पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ. 4) अधिवासाचा दाखला (सक्षम यंत्रणेने दिलेला) 5) वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल. 6) पासपोर्ट आकाराचा फोटो. 7) हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
अशी राहणार कार्यपध्दती : -
1) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जाणार आहेत.
2) ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5 हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार असून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1230 योजनादूत निवडण्यात येणार आहे.
3) मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10 हजार प्रती महिना एवढे मानधन देण्यात येणार आहे. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)
4) निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाणार असून हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.