मुल तालुक्यातील चिचाळा येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : मुल शहराला लागून असलेल्या जंगलात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केला असता गुराखी मूनिम गुरलावर (४५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. वाघाचे हल्ले वाढले असल्याने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुल तालुक्यातील चिचाळा येथील रहिवाशी असलेल्या मुनिम गुरलावार हा गुराखी रविवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी २५ शेळ्या घेऊन मुल शहराला लागून असलेल्या जंगलात गेला होता. सायंकाळी २४ शेळ्या घरी परतल्या. मात्र मुनिम व एक शेळी घरी परत आली नाही. त्यामुळे काही अनुचित घटना घडली असावी असा संशय ग्रामस्थांना आला.
याची माहिती संध्याकाळीच वन विभागाला देण्यात आली. दरम्यान संध्याकाळी ३० ते ४० ग्रामस्थ जंगलात गुराखी मुनिम याचा शोध घेण्यासाठी गेले. तिथे ग्रामस्थांना रक्त सांडलेले दिसले. रात्र भरपूर झाली असल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे ग्रामस्थ गावाला परत आले.
त्यानंतर आज सोमवार सकाळी वन विभागाच्या अधिकारी,पथकाने व ग्रामस्थांनी जंगलात जावून बघितले आता कक्ष क्रमांक ७५२ मध्ये गुराखी मुनिम याचा मृतदेह आढळला. दरम्यान गुरख्याच्या मृत्यूने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या भागात मानव वन्य जीव संघर्ष वाढला आहे. तेव्हा वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मृतक गुराखी मुनिम याचे मागे आई,पत्नी, दोन मुल,बहिण व बराच मोठा परिवार आहे. वन विभागाच्या वतीने मृतक मुनिम याचे कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत दिली आहे.