अर्चना पुट्टेवार च्या कार्यकाळातील प्रकरणे ; उपविभागीय अधिकारी,राहुलकुमार मीना यांनी घोटाळ्याचा आरोप असलेल्या नगररचना विभागालाच चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे फर्मान.

अर्चना पुट्टेवार च्या कार्यकाळातील प्रकरणे उपविभागीय अधिकारी,राहुलकुमार मीना यांनी घोटाळ्याचा आरोप असलेल्या नगररचना विभागालाच चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे फर्मान.


एस.के.24 तास


गडचिरोली : सासऱ्याचा सुपारी देऊन खून केल्याच्या आरोपात येथील नगरचना विभागाची तत्कालीन सहायक संचालक अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हिला अटक झाल्यानंतर बेकायदेशीर अकृषी परवान्यांचा विषय चर्चेत आला होता.पुट्टेवारच्या कार्यकाळातील अकृषी परवान्यांची चौकशी करावी,अशी मागणीही पुढे आली होती.उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांनी घोटाळ्याचा आरोप असलेल्या नगररचना विभागालाच चौकशी करुन अहवाल सादर करा,असे अजब फर्मान काढले आहे.


अर्चना पुट्टेवार हिची गडचिरोलीतील कारकीर्द वादग्रस्त होती.माफियांना हाताशी धरुन अनेक धोकादायक ठिकाणी तिने अकृषी परवाने देऊन मोठी उलाढाल केल्याचा आरोप होत आहे.गडचिरोलीसह अहेरी, आरमोरीत माफियांनी बेकायदेशीररीत्या पूरप्रवण क्षेत्रातही भूखंड विक्रीसाठी अकृषी परवाने मिळवल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. 


याशिवाय वनविभाग व महसूल विभागाच्या जागाही माफियांनी गिळंकृत केल्याचाही आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर पुट्टेवारच्या कार्यकाळातील अकृषी परवाने व भूखंड विक्री व्यवहाराची चौकशी करावी,अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष,विपुल खोब्रागडे यांनी केली होती.


उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांनी या मागणीचा संदर्भ देत नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनाच पुट्टेवारच्या कार्यकाळातील प्रकरणांची चौकशी करुन अहवाल सादर करावा व योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश काढले आहेत. ज्या विभागावर घोटाळ्याचा आरोप आहे,तो विभाग पारदर्शकपणे चौकशी करेल का, असा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील चंद्रपूर रोडवर आलिशान कार्यालये थाटून काही जणांनी भूखंड विक्रीचा सपाटा लावला आहे. 


पूरग्रस्त भागातील जागेलाही अकृषी परवाना मिळवून तेथील भूखंड लोकांच्या माथी मारण्याची हातोटी या माफियांना आहे. त्यामुळे या माफियांचे पुट्टेवारच्या कार्यकाळातील व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यासाठी सविस्तर चौकशी होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांना संपर्क केला असता मी बैठकीत आहे, नंतर बोलतो असे सांगून याविषयी प्रतिक्रिया देणे टाळले.


उच्च स्तरीय चौकशी केव्हा ?


पुट्टेवारच्या अटकेनंतर शहरातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आले. यात गुन्हाही नोंद झाला आहे. तिकडे अहेरीतील भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण झाले. देसाईगंजातही एका राष्ट्रीय पक्षाच्या वळचळणीला असलेल्या व सतत वादाच्या केंद्रस्थानी राहणाऱ्या एका स्वयंघोषित नेत्याचे नाव चर्चेत आहे. 


त्यामुळे अर्चना पुट्टेवारच्या कार्यकाळातील अकृषी परवान्यांची त्रयस्त समितीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करणे गरजेचे आहे.प्रशासनात चौकशी करण्याऐवजी पळवाट शोधून माफियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कोण करतयं, असा प्रश्न निर्माण होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !