चंद्रपूर च्या ताडोबात वाघ आणि कोब्रा यांच्यातील थरार ; २५ मिनिटे या जंगलाच्या राजाला जागेवरून हलूसुद्धा दिले नाही.

चंद्रपूर च्या ताडोबात वाघ आणि कोब्रा यांच्यातील थरार२५ मिनिटे या जंगलाच्या राजाला जागेवरून हलूसुद्धा दिले नाही. 


एस.के.24 तास


चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांचीच मक्तेदारी. त्यामुळे इतर प्राण्याच्या अस्तित्वाला वावच नाही. त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल बोलायलाच नको. ते बिचारे कायम वाहनांखाली चिरडले जाणार. नागपंचमी च्या पूर्वसंध्येला चक्क एका कोब्राने वाघाला जेरीस आणले आणि ते सुद्धा तब्बल २५ मिनिटे या जंगलाच्या राजाला जागेवरून हलूसुद्धा दिले नाही. 


युद्धापूर्वीची शांतता जी म्हणतात ना, ती काल पर्यटकांनी ताडोबात अनुभवली. त्यांच्यातला हा थरार टिपलाय वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार नितीन घाटे यांनी.


ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आजवर वाघांच्या करामती पर्यटकांनी अनुभवल्या.त्या प्रत्येकवेळी वाघांचेच वर्चस्व ताडोबात अधोरेखित झालेले दिसून आले. मात्र, नागपंचमीच्या पूर्वसंध्येला चक्क कोब्राने वाघाला जेरीस आणले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सध्या व्याघ्रपर्यटनाला सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांचा मोर्चा बफरमधील पर्यटनाकडे वळला आहे. तसेही गेल्या दोन-तीन वर्षांपासून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील वाघांचा बोलबाला अधिक आहे. त्यामुळे आता गाभा क्षेत्र नाही तर बफर क्षेत्र पर्यटकांची पहिली पसंती आहे.


बफर क्षेत्रात छोटा मटका, नयनतारा, भानुसखिंडी, वीरा यासारख्या अनेक वाघांचे वर्चस्व राहिले आहे. यातील वीरा या वाघिणीचा बछडा असलेल्या कालू या वाघासोबत हा प्रसंग घडला. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बेलारा क्षेत्रात पाण्याच्या झऱ्याजवळ कालू हा वाघ मस्तपैकी आळोखेपिळोखे देत पहुडलेला होता. तेवढ्यात त्या ठिकाणी कोब्रा आला. कालू वाघाला त्याच्या येण्याची भनक देखील लागली नाही. जेव्हा कोब्रा फणा काढून त्याच्यासमोर बसला तेव्हा अचानक या वाघाला काहीतरी जाणवले. 


सुस्तावलेल्या कालू वाघाने समोर पाहताच त्याला कोब्रा दिसला. त्याने एक क्षण त्याच्याकडे पाहून ना पहिल्यासारखे केले आणि दोघेही एक-दोन नाही तर तब्बल २५ मिनिटे एकमेकांकडे बघत राहिले. एरवी वाघाला समोर प्राणी दिसला तर तो त्यावर झडप घातल्याशिवाय राहात नाही. मात्र, याठिकाणी चित्र काही वेगळेच रंगले होते.


एक वेळ वाटले की कोब्रा वाघाला दंश करणार आणि एक वेळ वाटले की वाघ कोब्राला त्याची शिकार करणार. त्यामुळे पर्यटक देखील श्वास रोखून हा सर्व प्रसंग पाहत होते. थोड्या वेळात काहीतरी घडेल, आता काहीतरी घडेल असे वाटत होते. युद्धापूर्वीची ही शांतता असेल असेही पर्यटकांना एक क्षण वाटून गेले, पण कसले काय काय. 


हा सगळा फ्लॉप शो ठरला आणि पर्यटक माघारी परतले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाने केलेल्या शिकारीचा थरार अनेकदा पाहायला मिळतो, पण कदाचित पहिल्यांदा वीरा वाघिणीचा बछडा आणि कोब्रा यांच्यात थरार रंगता रंगता राहिला. मात्र, नागपंचमीच्या पूर्वसंध्येला पर्यटकांना वाघासोबतच कोब्राने देखील दर्शन दिले.त्यामुळे ताडोबात वाघांचीच नाही तर इतर प्राण्यांची देखील मक्तेदारी असल्याचे या घटनेने सिद्ध केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !