१६ आगस्ट पासून राज्यभरातील ग्रामपंचायतींचे कामबंद आंदोलन.
★ सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होण्याचे अ.भा.सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष,नंदकिशोर वाढई यांचे आवाहन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : आपल्या हक्क व अधिकाराचे रक्षण करण्यासाठी तथा ग्राम विकासासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, राज्य सल्लागार प्रा राजेंद्र कराडे, विदर्भ अध्यक्ष अँड. देवा भाऊ पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १६ ऑगस्ट २०२४ पासून कडकडीत ग्राम पंचायत बंद आंदोलन करण्यात येत असून २८ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार असून यात चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी केले आहे.
आपल्या आवाहनात त्यांनी सांगितले आहे की, आंदोलन १०० % यशस्वी करण्यासाठी आंदोलन काळात कुणीही ग्रामसभा, मासिक सभा घेऊ नये, ग्राम पंचायत संबंधी ईतर कुठलेही व्यवहार या काळात करू नये. सर्वांनी एक होऊन ही लढाई जिंकायची आहे. समोरील विधानसभा निवडणुका लक्षात घेता "अभी नहीं तो कभी नही.
लोहा गरम है, मार दो हथौड़ा !" ही वृत्ती बाळगून आपण सर्व तन, मन,धनाने या आंदोलनात सहभागी होऊन शासनाला आपल्या मागण्या पूर्ण करण्यास बाध्य करूया! आपल्या या आंदोलनाला ग्रामसेवक, ग्राम पंचायत कर्मचारी यूनियनसह अनेक संघटनांचा पाठिंबा असल्याने आंदोलनाला अधिकच बळ मिळाले असून आपण नक्कीच यशस्वी होऊ हा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.