गडचिरोली जिल्ह्यातील गायवाटप घोटाळा प्रकरणी आय.ए.एस.अधिकारी, शुभम गुप्ता दोषी. ★ भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दुधाळ गाय वाटप योजनेत झालेला भ्रष्टाचार प्रकरण.

गडचिरोली जिल्ह्यातील गायवाटप घोटाळा प्रकरणी आय.ए.एस.अधिकारी,शुभम गुप्ता दोषी.


भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दुधाळ गाय वाटप योजनेत झालेला भ्रष्टाचार प्रकरण.


चंदू बेझेलवार !! तालुका प्रतिनिधी,भामरागड !!


भामरागड : जिल्ह्यातील भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दुधाळ गाय वाटप योजनेत झालेल्या मोठ्या भ्रष्टाचारावर  चालविलेल्या वृत्तमालिकेची अखेर दखल घेण्यात आली असून यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी, शुभम गुप्ता दोषी आढळले आहे. नागपूर आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्तांनी तसा चौकशी अहवाल शासनाकडे पाठवला असून गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याचे त्यात नमूद केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.


आदिवासींच्या विकासासाठी केंद्र व राज्याकडून विविध योजना राबविण्यात येतात. यात दुधाळ गाय वाटप योजनेचा समावेश आहे. वर्षभरापूर्वी भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासी लाभार्थ्यांना या दुधाळ गायी घेण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून पैसे देण्यात आले होते. 


यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी कार्यालयातील कर्मचारी व लाभार्थ्यांना धमकावून गैरव्यवहार केला होता. ‘ प्रत्यक्ष भामरागड परिसरात जाऊन लाभार्थ्यांना विचारपूस केली असता.गाय घेण्यासाठी मंजूर निधी त्यांच्या खात्यातून इतरत्र वळविण्यात आल्याचे समोर आले होते.


मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सुरु होता. यासंदर्भात बातम्या प्रकाशित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आदिवासी विभागाने चौकशी समिती नेमली होती.या समितीने लाभार्थी, कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयान नोंदवत संबंधित अहवाल शासनाकडे सादर केला आहे.शुभम गुप्ता यांनी घोटाळा केल्याचे उघडपणे म्हटले आहे. 


इतकेच नव्हे तर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील गुप्ता यांनी धमकावून आमच्याकडून नियमबाह्यपणे हे करून घेतले, असाही धक्कादायक आरोप केला आहे. तब्बल वर्षभरानंतर हा चौकशी अहवाल राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आला आहे.पूजा खेडकर प्रकरण ताजे असताना पुन्हा एक " आयएएस " अधिकाऱ्याचे कारनामे उघड झाल्याने शासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


वादग्रस्त कारकीर्द : -


एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना शुभम गुप्ता यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती.आमदार डॉ. देवराव होळी यांनी गुप्ता हे कंत्राटदारांना धमकावून लाच मागत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.दोन वर्षानंतर याही प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आले आहे. आरोग्य आणि परिवहन विभागाचा नकारात्मक अभिप्राय असताना देखील गुप्ता यांनी लाखो रुपये खर्च करून तांत्रिक दृष्ट्या अयोग्य अशा दुचाकी रुग्णवाहीका खरेदी केल्या होत्या. त्या आज धुळखात पडून आहेत. त्यानंतर ते धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणून रुजू झाले. त्याहीठिकाणी त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर आक्षेत घेत अविश्वास आणण्यात आला होता.



आरोप बिनबुडाचे : - 

गाय वाटप घोटाळ्यात दोषी आढळल्यानंतर गुप्ता यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, कोणतेही पुरावे नसताना या अहवालात चुकीच्या पद्धतीने माझ्यावर दोषारोप करण्यात आलेले आहे. त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !