वाल्मीक ऋषीमुळेच जगाला प्रभू रामचंद्र कळले. - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
★ ब्रम्हपुरी तालुक्यातील ४६२ घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : महान संत वाल्मीक ऋषी यांचा वारसा लाभलेल्या भोई समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तथा समाजातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील दुर्बल घटक यांची अतिशय हलाखीची परिस्थिती व जिवनमान बघून यांचेकरिता महाविकास आघाडी सरकार काळात या खात्याचा मंत्री असतांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. आज एकट्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला.
ज्या थोर वाल्मीक ऋषींनी आपल्या रामायणातून संपूर्ण जगाला प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घडवून दिले. अशा प्रामाणिक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी सदैव प्रयत्न करणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रम्हपुरी येथे आयोजित यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने मंचावर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प. सदस्या स्मिता पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, पं.स.गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे, भोई समाज नेते डॉ. दिलीप शिवरकर, सीडीसीसी बॅक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, कृउबा संचालक ब्रम्हदेव दिघोरे, भोई समाज नेते दिनानाथ वाघमारे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाजी तुपट, मिलींद भन्नारे, सुधीर शिवरकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सिंदेवाही शहरातील मेश्राम कुटुंबाची व्यथा बघितल्यानंतर विमुक्त भटक्या जाती व जमातींकरिता विकास योजना आणण्याचा मी संकल्प केला. तर महाविकास आघाडी सरकार काळात मंत्री झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित करून हजारोंच्या संख्येने राज्यातील लाभार्थ्यांना स्वप्नातील हक्काची घरे दिली.
तर संपूर्ण राज्याच्या तुलनेत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ६३८१ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला असून पुढील काळात एकही कुटुंब घरकुला पासून वंचित राहणार नाही. सोबतच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात गोसेखुर्दचे आणि शेतीसाठी उपलब्ध करून देऊन या क्षेत्रात शेती समृद्ध क्रांती घडविली. मानवतेचे प्रेम हे सर्वश्रेष्ठ असून माणुसकी हीच जात सर्वात मोठी आहे. म्हणूनच मी मानव सेवेसाठी सदैव अग्रेसर राहून जनतेसाठी हिरीरीने काम करतो असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच इतर घरकुल योजनांमार्फत अनेक लाभार्थ्यांना देखील घरकुले मंजूर करून दिली. येत्या काळात आमची सत्ता येताच महागाईचा विचार करून घरकुलाच्या निधीत दुपटीने वाढ करत ३ लक्ष रुपये करू असे अभिवचन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. यानंतर ब्रम्हपुरी तालुक्यातील एकूण ४६२ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,राहूल मैंद ,तर प्रस्ताविक सुधीर शिवरकर यांनी केले. आयोजित कार्यक्रमास तालुका काँग्रेस कमिटी सर्व सेल पदाधिकारी, ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष, ग्राम पातळीवरील सर्व सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने घरकुल लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.