जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तिसऱ्या दिवशीच उचलबांगडी
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!
गडचिरोली : वादग्रस्त कारकिर्दीमुळे चर्चेत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रुडे यांच्याकडे पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा प्रभार देण्यात आल्याची बाब उजेडात आणताच तीन दिवसात प्रशासनाने निर्णय बदलून वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) डॉ.माधुरी किलनाके यांच्याकडे जबाबदारी सोपवली.
यामुळे आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांनी सेवानिवृत्तीच्या मुदतवाढीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) नागपूर येथे दाद मागितली होती. मात्र, २९ जुलै २०२४ रोजी आपला अर्ज मागे घेतला.
त्यामुळे जागा रिक्त झाली होती.डॉ.माधुरी किलनाके या वर्ग १ अधिकारी असतानाही त्यांना डावलून वर्षभरा पूर्वीच निवृत्त झालेले व विशेष बाब म्हणून पुन्हा सेवेत आलेले रुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रुडे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
विशेष म्हणजे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक,सर्जन व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत मर्जीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन डॉ.रुडे हे लगबगीने जिल्हा शल्यचिकित्सक पदाच्या खुर्चीत बसले होते.