चंद्रपूर मध्ये मनसे च्या बैठकीत राडा ; राज ठाकरे नी सभा स्थळ सोडुन जाताच दोन गटात हाणामारी.
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून मनदीप रोडे व राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांची उमेदवारी जाहीर केली आणि स्थानिक एन.डी. हॉटेलमधून निघून गेले.यानंतर भोयर यांच्या उमेदवारीवरून सभास्थळी एकच राडा झाला. यावेळी मनसेच्या दोन गटात चांगलीच हाणामारी झाली. भोयर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. या हाणामारीत मनसे जिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर जखमी झाले.
नवनिर्माण यात्रेनिमित्त राज ठाकरे सायंकाळी एक तास उशिरा येथील एन.डी हॉटेलमध्ये दाखल झाले.यावेळी त्यांनी रोडे आणि भोयर यांना उमेदवारी जाहीर केली. भोयर यांच्या नावाची घोषणा करून ठाकरे निघून गेले. त्यानंतर सभास्थळी भोयर व जिल्हा सचिव बोरकर यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत बोरकर यांच्या हाताला दुखापत झाली. बोरकर गटाने भोयर यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
दालमिया सिमेंट कंपनी कडून पैसे खाल्ल्याचा आरोप करताच भोयर समर्थकांनी बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.हा राडा इतका वाढला की पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.भोयर यांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही,ही उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी यावेळी बोरकर यांनी केली.आम्हाला राज ठाकरे यांना भेटायचे आहे,आम्हाला भेटू द्या,अशी मागणी करीत बोरकर समर्थक हॉटेलात ठिय्या करून बसले होते.
राजुरा विधानसभा मतदार संघातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. तसेच भोयर यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार उभा करू, असा इशारा बोरकर यांनी दिला. गुढीपाडव्याला राज ठाकरे यांची भेट घेतली तेव्हा राजुरा विधानसभा मतदारसंघातून तयारी करण्याचे आदेश त्यांनी मला दिले होते.
मात्र आता भोयर यांना उमेदवारी जाहीर केली. २००९ पासून आम्ही सर्व काम करीत आहे. मुरली ऍग्रो सिमेंट कारखान्यात आंदोलन केले तेव्हा सर्व कामगार कारागृहात गेले. शिक्षा भोगणाऱ्या उमेदवारी नाही व काम न करणाऱ्याला उमेदवारी दिली हा प्रकार योग्य नाही, असेही बोरकर म्हणाले.
तत्पूर्वी,राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचा सल्ला दिला होताय त्यांनी पाठ फिरवताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्याच आदेशाला हरताळ फासली.