चंद्रपूर जिल्ह्यात " मुख्यमंत्री वयोश्री " योजनेचे 10766 अर्ज प्राप्त.

चंद्रपूर जिल्ह्यात " मुख्यमंत्री वयोश्री " योजनेचे 10766 अर्ज प्राप्त.


एस.के.24 तास


चंद्रपूर : राज्य शासनाने 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना मदतीचा हात म्हणून " मुख्यमंत्री वयोश्री " योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून एकवेळ एकरकमी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 10766 अर्ज प्राप्त झाले असून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासन व समाजकल्याण विभागाने केले आहे.


" मुख्यमंत्री वयोश्री " योजनेचे नागपूर विभागात एकूण 66898 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यात प्राप्त अर्जांची संख्या 10766 आहे.ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणे, तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरीता या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये लाभार्थ्यांच्या बचत खात्यात थेट वितरीत करण्यात येणार आहे.


ही उपकरणे खरेदी करता येणार : -


मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता/दुर्बलतेनूसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर खरेदी करता येतील. तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योग उपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मन:शक्ती केंद्र,प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे.


लाभार्थी पात्रता : 31 डिसेंबर 2023 रोजी वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष रुपयांच्या आत असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.


आवश्यक कागदपत्रे : -


या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक, पासपोर्ट आकाराचे 2 छायाचित्रे, स्वयंघोषणापत्र इ. कागदपत्रांची आवश्यकता आहे.


येथे करा संपर्क : - 


अधिक माहितीसाठी सबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर तसेच शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा कार्यालयात संपर्क साधावा. सदर कार्यालयात पात्र ज्येष्ठ नागरीकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून सादर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !