पोंभूर्णा येथे " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजनेची काँग्रेस खासदाराच्या नावाने फसवी जाहिरात प्रकरणी गुन्हा दाखल.
एस.के.24 तास
पोंभूर्णा : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली.पोंभूर्णा येथील काँग्रेस कार्यकर्त्याने नावाचा दुरुपयोग करून काँग्रेस खासदार ‘प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना’ या नावाची खोटी योजना तयार करून सोशल मीडियाद्वारे प्रसारीत करून एक प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र अंमलबजावणी सुरू झाली आहे. ही योजना १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे; मात्र काही समाजकंटकांनी महाराष्ट्र शासनाच्या या योजनेच्या नावाचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.काँग्रेस खासदार " प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना " या नावाची खोटी योजना तयार करून सोशल मीडियाद्वारे प्रसार करून दिशाभूल करणे सुरू झाले आहे.
संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्या अनुषंगाने पोंभूर्णा पोलिसांनी धम्मा निमगडे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे निमगडे यांनी समाज माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाचा गैरवापर करून लोकांमध्ये संभ्रम पसरवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.
खोटी माहिती व बनवाबनवी करणाऱ्यावर कारवाई करावी,यासाठी पोंभूर्णा पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार देण्यात आली आहे.भाजपच्या महिला आघाडी प्रदेश महामंत्री अलका आत्राम यांनी ही तक्रार केली आहे.
या तक्रारीत आत्राम यांनी म्हटले आहे की,पोंभूर्णा येथील काँग्रेसचे समाज माध्यम प्रमुख धम्मा निमगडे यांनी योजनेची थट्टा करून " प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना " नावाची फसवी योजना व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित केली. या प्रकरणी पोंभूर्णा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.
ही तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी चौकशी करून भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२) नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे तक्रार करणाऱ्या अलका आत्राम यांनी पोलीस अधीक्षक,मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन हा फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आणून दिला.या शिष्टमंडळात अलका आत्राम,नगराध्यक्ष पिपरे, कोटरंगे,गेडाम, रोहिणी ढोले, सुनीता मॅकलवार, वासलवार यांचा समावेश आहे.
मला " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " ही योजना खासदार,प्रतिभा धानोरकर यांनी सर्व घटकातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगायचे होते.ती पोस्ट डिलीट झाली आणि चुकीने " प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना " अशी पोस्ट प्रसारित झाली.यात माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. - धम्मा निमगडे, प्रसिद्धीप्रमुख,काँग्रेस समिती,पोंभूर्णा.