अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नी ने केली हत्या.
एस.के.24 तास
यवतमाळ : अनैतिक संबंधातील अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नीने निर्घुण हत्या केली. ही धक्कादायक घटना घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी प्रियकरासह पत्नीला ताब्यात घेतले.
प्रभाकर कवडुजी मारवाडी वय,४०व र्ष रा.राजूरवाडी ता. घाटंजी असे मृत पतीचे नाव आहे. तर जयश्री प्रभाकर मारवाडी वय,२८ वर्ष आणि सुरज रोहणकर वय,२८ वर्ष रा.समता नगर, वर्धा असे पोलिसांनी ताब्यात घतलेल्या मारेकरी पत्नी सह प्रियकराचे नाव आहे.
या प्रकरणी पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे प्रभाकर हा त्यांची पत्नी व दोन चिमुकल्यांसह आनंदाने राहत होते. अश्यातच पत्नीने माहेरकडील सुरज या युवकासोबत अनैतिक संबंध जोडले. त्यामूळे प्रियकर सुरज हा पत्नीच्या माहेराकडील असल्याने त्याची घरी ये जा वाढली. चिमुकलेही त्याला तोंडभरून मामा म्हणायचे. मात्र, पतीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अनैतिक संबंधात पती अडसर ठरू लागल्याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची राहत्या घरी तोंड दाबून हत्या केली.
प्रभाकर मारवाडी याची हत्या केल्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून मृतदेह गावाबाहेर रस्त्याच्या कडेला फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा अपघाती मृत्यू दाखविण्यासाठी कट रचला. पहाटेच्या सुमारास दोन तास अपघाती मृत्यू असल्याची चर्चा नागरिकांत होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले.
घटनेनंतर पोलिसांनी मृतकाच्या पत्नीसह दोन्ही चिमुकल्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून कसून चौकशी केली. यावेळी मृतकाच्या चिमुकल्याने घटनेदरम्यान घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर मृतकाच्या पत्नीने हत्येचा गुन्हा कबूल केला. गुन्ह्यातील आरोपी प्रियकर सुरज रोहणकर हा घटनेनंतर फरार झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेत काही तासातच त्याला ताब्यात घेतले.त्यानंतर तपासकामी घाटंजी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक, शशीकांत नागरगोजे,निलेश कुंभेकर,संदिप गोहणे करीत आहेत.
जयश्री हीने प्रियकर सुरज याच्यासोबत मिळून पती प्रभाकर याची घरातच हत्या केली. यावेळी प्रभाकर याचे दोन्ही चिमुकले घरातच झोपून होते. त्या चिमुकल्या मुलांनी सदर घटनाक्रम बघितला. परंतु, आपल्याला मारण्याच्या भितीने अंगावर ब्लॅंकेट पांघरून झोपले असल्याचे भासविले होते.
आईच्या अनैतिक संबंधातून वडीलाच्या हत्या प्रकरणात मृतकांच्या दोन चिमुकल्या मुलांना अनाथ व्हावे लागले. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे सदर घटनेचा घटनाक्रम चिमुकल्याने बघितला. परंतू भितीपोटी तथा चाणक्य बुध्दीचा वापर करीत वडीलांच्या हत्येचा खुलासा चक्क पोलिसांच्या पुढे केला. यामुळे या चिमुकल्या मुलांच्या या कर्तबगारीची चर्चा होत असताना मात्र वडीलाचे छत्र हरविल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.