कुरखेडा सती नदी वरील पर्यायी रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून ; निकृष्ट बांधकामाच्या दर्जा बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
★ बॅरिकेट लावून रहदारी बंद : वाहनचालकांचा खोळंबा
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
कुरखेडा : कुरखेडा शहराजवळील सती नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रातून पर्यायी रस्ता केला होता. मात्र, पहिल्याच पावसात हा रस्ता 4 जुलैला सकाळी 9.30) वाजता वाहून गेला.सात गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग करून प्रशासनाने रहदारी बंद केली आहे.
ब्रह्मपुरी ते देवरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या मार्गावरील कुरखेडातील सती नदीत जुन्या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नदीपात्रातच पर्यायी रस्ता तयार केला होता.या मार्गावर ऐन मधोमध पाण्याच्या प्रवाहाने भगदाड पडले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे
नदी पलीकडील गोठणगाव,जांभूळखेडा, येरंडी, मालदुगी, चांदागड,सोनसरी, शिवणी आदी गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येत शालेय विद्यार्थी, रुग्ण,शासकीय कार्यालयीन कामाकरिता नागरिक, चाकरमानी तसेच दूध पुरवठा करणारे शेतकरी ये-जा करतात,त्या सर्वांची अडचण झाली आहे. या मार्गावरील बस वाहतूक तसेच खाजगी प्रवासी वाहतूकही बंद आहे.
रस्ता वाहून गेल्याची वार्ता पसरताच नागरिकांची नदीच्या दोन्ही तीरावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून कुरखेडा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे यांच्या नेतृत्वात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दोन्ही बाजूंना खड्डा खोदून व बॅरिकेट लावून मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला.
दिरंगाईचा फटका : - नवनिर्मित पुलाच्या बांधकामात झालेली दिरंगाई व नियोजन शून्यतेचा फटका तालुकावासीयांना बसत आहे.बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.या पुलाचे काम जलदगतीने झाले असते तर पावसाळ्यात नागरिकांची तारांबळ टळली असती.दिरंगाईमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.असे एस.के.24 तास च्या प्रतिनिधी शी बोलताना नागरिक सांगत होते.
पर्यायी मार्ग कमकुवत असल्याने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचे निर्देश दिलेले आहेत.त्याप्रमाणे हलकी व जड वाहतूक पर्यायी मानि वळविण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या असून हा मार्ग बेरिकेटींग करुन बंद करण्यात आला आहे.कोणाच्याही जीवाला धोका होऊ नये,यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात केला आहे. - रमेश कुंभरे,तहसीलदार,कुरखेडा