एटापल्ली तालुक्यातील तोडसा फाट्याच्या वळणावर ; दोन दुचाकीच्या धडकेत एक युवक ठार,दोन गंभीर.
एस.के.24 तास
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील तोडसा फाट्याच्या वळणावर दोन दुचाकीच्या सामोरासमोर झालेल्या जबर धडकेत रावजी मेस्सो गावडे वय,26 वर्ष रा. तोडसा जागीच ठार झाला असून उलगे तिम्मा वय, 45 वर्ष रा,जवेली (खुर्द) व शिवाजी कोत्तु वेळदा वय,41 वर्ष) रा तोडसा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांत दोन युवकांचा मृत्यू झाल्याने तोडसा गावात शोककळा परतली आहे.रावजी गावडे, शिवाजी वेळदा व अन्य एक असे तिघे ता.09 जुलै मंगळवारी सायंकाळी 6 : 00 वा.दरम्यान तोडसा येथून MH.33 R 2408 क्रमांक च्या दुचाकी वरून एटापल्ली च्या दिशेने येत होते.त्याच वेळी उलगे तिम्मा व अन्य एक असे दोघे विरुद्ध दिशेने एटापल्ली वरून MH.33 U 2925 क्रमांकाच्या दुचाकीवरून जवेली गावाकडे जात होते.
यावेळी तोडसा फाट्यावरील वळणावर या दोन्ही दुचाकीत समोरासमोर भीषण धडक झाली, यात रावजी गावडे याच्या छातीला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला तर उलगे तिम्मा व शिवाजी वेळदा या दोघांनाही पायाला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
पोलिसांनी ता.10 जुलै) बुधवारी दुपारी 12:00 वा.घटनेचा पंचनामा केला असून मृतक रावजी गावडे याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात केली जाणार आहे.रुग्णालयात एकाच वैद्यकीय अधिकारी उपस्थित असल्याने जखमींवर वेळीच उपचार करण्यात व मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात दिरंगाई होत आहे.
त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थितीवर वरिष्ठ पातळीवरून कारवाही करून वैद्यकीय सेवा सक्षम करण्याची मागणी तालुका भाजप अध्यक्ष तथा तोडसाचे उपसरपंच प्रशांत आत्राम व नागरिकांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.