चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटला असून ३०० घरात पाणी शिरले.

चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटला असून ३०० घरात पाणी शिरले.


एस.के.24 तास


चंद्रपूर : सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटला असून ३०० घरात पाणी शिरले आहे. ग्रामस्थांना घराबाहेर काढले जात असून सर्वत्र पाणीच पाणी असल्याने चंद्रपूर - मुल मार्ग पूर्णतः बंद झाला आहे.मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने धाव घेतली आहे. या जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. 


तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अश्यात चंद्रपूर येथील चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटल्याने ३०० घरांमध्ये पाणी शिरले आहे. सर्वत्र पाणीच पाणी असल्याने अनेक जण मदतीला धावले आहे. या घटनेची माहिती कळताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.


चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. सोबतच गावातील अनेक चारचाकी व दुचाकी वाहने पाण्याखाली आली आहेत. प्रसंगी त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या गावातील नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून यासंदर्भात पहाटे 6.30 वाजता माहिती दिली. तातडीने मदतकार्य मिळणे अपेक्षित असल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात आले.


मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकाऱ्यांना मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश दिले. ‘चिचपल्ली गावाची प्रत्यक्ष पाहणी करा. तेथील नुकसानीचे पंचनामे करा. यासोबतच गावातील लोकांची तातडीने जिल्हा परिषद शाळेत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करा,असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 


भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे आणि महानगर उपाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राकेश बोमनवार यांनी देखील प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशा सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. तलावाचे पाणी घरात शिरल्याने शेकडो घरांची पडझड झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात जवळपास 1000 ते 1200 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, तसेच जिल्ह्यातील मुख्य मार्ग नागभीड - नागपूर हायवे पुराच्या पाण्यामुळे बंद पडला होता.


त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर मार्ग जे पावसाच्या पाण्यामुळे बंद पडले होते, ते पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर मार्ग मोकळे झाले आहेत.घरांचे नुकसान तसेच शेताचे नुकसान यांना मदत कार्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.


पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील एका घराची भिंत पडल्यामुळे पाच लोक जखमी झाले, यांच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार चालू आहे.गत 24 तासापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून पुढील दोन – तीन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर परिस्थितीत योग्य काळजी घ्यावी. 


मदतीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०७१७२-२५००७७ आणि ०७१७२-२७२४८० या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच पूर परिस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी, विनय गौडा जी.सी.यांनी केले आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !