गडचिरोली येथे भागिदारांची फसवणूक केल्याने बहीण व भावास अटक.
एस.के.24 तास
गडचिरोली : येथील सोनापूर शिवारातील सर्व्हे क्र. 18/1 मधील शेतजमीन आपल्या सहभागीदारांना अंधारात ठेवून त्या जमिनीला अकृषक करुन परस्पर विक्री केल्याप्रकरणी जयश्री चंद्रिकापुरे (निकोसे) व विशाल निकोसे या दोन भावंडांना आज, 8 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे या भावंडासह येथील कंत्राटदार नागनाथ (राजू) भुसारे आणि मनोज सुचक यांनी सामूहिकरित्या मौजा सोनापूर शिवारातील सर्वे क्र. 18/1 मधील 0.51.59 हेक्टर आर शेतजमीन जमीनमालक सुरेश नैताम यांच्याकडून खरेदी केली.आपल्याकडे पैसे नाहीत, असे सांगून जमीन खरेदीसाठी निकोसे भावंडांनी भुसारे यांच्याकडून 24 लाख व सूचक यांच्याकडून 24 लाख 13 हजार असे एकूण 48 लाख 13 हजार रुपये घेऊन जमीन मालकाला दिले व जमीन चारही सहभागीदारांच्या नावाने रजिस्ट्री करुन घेतली.
जमीनीची खरेदी झाल्यानंतर नागनाथ भुसारे व मनोज सूचक यांना कुठल्याही प्रकारची भनक लागू न देता जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे या दोन भावंडांनी सहभागीदार भुसारे आणि सूचक यांच्या खोट्या सह्या करुन त्यांच्या संमतीचे संमतीपत्र नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे 8 डिसेंबर 2022 रोजी सादर केले व सदरची जमिन अकृषक करुन घेतली.
त्यानंतर या जमिनीचे प्लॉट पाडून सहभागीदारांच्या परवानगीशिवाय जयश्री चंंद्रिकापूरे व विशाल निकोसे यांनी सदर जमीनीतील प्लॉट शितल राहुल ठवरे, डॉ. राहुल रमेश ठवरे, मंगला राजेश भट्टलवार व राहुल मधुकरराव निलमवार या चार जणांच्या नावाने करारनामा करुन त्यांच्याकडून प्रती प्लॉट 40 लाख रुपयेप्रमाणे विक्री केली.
यासंदर्भात सहभागीदार भुसारे व सुचक यांना आपली फसवणूक करुन परस्पर निकोसे भावंडांनी जमीन विकल्याचे माहित झाल्यानंतर त्यांनी गडचिरोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.याशिवाय त्यांच्याविरोधात न्यायालयातही धाव घेतली. याप्रकरणी आज, गडचिरोली पोलिसांनी निकोसे भावंडांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे.
यासंदर्भात गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्याशी संपर्क साधला असता, निकोसे भावंडांविरोधात चार दिवसापूर्वीच गुन्हा दाखल झाला असून आज त्यांना अटक करण्यात आली असून, उद्या 9 जुलै रोजी त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.