अतिवृष्टी आणि वेकोलीच्या कृत्रिम संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा.
■ अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष,नंदकिशोर वाढई यांची प्रशासनाकडे मागणी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील अती मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सामान्य माणसाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. चिचपल्लीत मामा तलाव फुटल्यामुळे जवळपास ३०० कुटुंब उद्ध्वस्त झालेत अशा अनेक घटना संपूर्ण चंद्रपूर जिल्हा मध्ये घडल्या आहेत.
प्रशासकीय यंत्रणेने त्वरित लक्ष घालून या उध्दवस्त झालेल्या कुटुंबातील माणसांना अन्न, वस्त्र, निवारा, या मूलभूत गरजा लवकरात लवकर पोहचवण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली पाहिजे. त्याच प्रमाणे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली असुन प्रचंड नुकसान झाले आहे.
एकीकडे हे नुकसान नैसर्गिक आहे तर वेकोली प्रभावीत गावांमध्ये वेकोलीच्या चुकीच्या नियोजनामुळे हे नुकसान कृत्रिम आणि मानवनिर्मित आहे. वेकोलीने मोठ मोठे मातीचे ढिगारे टाळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी खूप मोठे नुकसान होत आहे.
त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. या राष्ट्रीय महामार्गाची उंची ही क्षमतेपेक्षा जास्त असल्याकारणाने शेतकऱ्यांची जमीन पाण्या खाली बुडलेली आहे. यावर सुद्धा प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे एवढेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा बेरिंग केल्यामुळे पाण्याचा निचरा लवकरात लवकर होत नाही.
सदर गंभीर बाब लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टीकडे लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने प्रशासकीय अधिकाऱ्याने यावर लवकरात लवकर पंचनामे करून मदत पोहोचवावी तसेच वेकोलीला सुध्दा जबाबदार धरुन आवश्यक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी केली आहे. अन्यथा अखिल भारतीय सरपंच संघटना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.