गडचिरोली जिल्ह्यात 6 महिन्यात विविध भागातील 5 जणांचा हिवतापामुळे मृत्यू झाला.

गडचिरोली जिल्ह्यात 6 महिन्यात विविध भागातील 5 जणांचा हिवतापामुळे मृत्यू झाला.


एस.के.24 तास

गडचिरोली : यावर्षी सहा महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागातील ५ जणांचा हिवतापामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १७७१ रुग्णाचे निदान झाले. जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी रिक्त पदे आणि निर्मूलन साहित्याची कमतरता यामुळे येत्या काही महिन्यात आदिवासी भागात हिवतापाचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाने वेळीच पावले उचलली पाहिजे अशी मागणी जनतेतून होत आहे.


राज्यात राजधानी मुंबईनंतर हिवातापाचे सर्वाधिक रुग्ण आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. दरवर्षी जून ते डिसेंबर या सात महिन्यात जिल्ह्यातील हिवताप रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. त्यामुळे काहींना जीवही गमवावा लागतो. हिवताप आटोक्यात आणण्यासाठी दरवर्षी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केल्या जातात.


२०२७ पर्यंत हिवतापमुक्त भारत करणे सरकारचे लक्ष आहे. परंतु रिक्त पदांमुळे यावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात आजघडीला अतिदुर्गम भामरागड, धानोरा आणि कोरची तालुक्यातील १६ प्राथमिक आरोग्य केंद्र हिवतापदृष्ट्या अतिसंवेदनशील आहेत. गेल्या सहा महिन्यात याच भागातील ५ जणांचा हिवतापाने मृत्यू झाला.


यात ३ लहान मुलांचा समावेश आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील हिवताप विभाग यासाठी कार्यरत असला तरी या विभागात एकूण मंजूर १९३ पदांपैकी ७८ पदे रिक्त आहेत. यात जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचाही समावेश असून काही महत्वाची पदे देखील प्रभारीवर अवलंबून आहे. हिवताप निर्मूलनासाठी लागणारी औषधे मुबलक उपलब्ध आहेत. परंतु झोपेत डास दंशापासून रोखणारी मच्छरदानी केवळ १० हजार लोकांनाच वाटप करण्यात आली आहे. तर हिवताप प्रभावित क्षेत्रातील लोकसंख्या ३ लाखांच्या पुढे आहे. त्यांमुळे पुढील पाच महिने प्रशासनासमोर हिवतापाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.


२.५ नागरिकांमागे १ मच्छरदानी : - 

जिल्ह्यातील हिवताप प्रभावित भाग घनदाट जंगलाने वेढलेला आहे. हिवतापाचे डास दिवसा जंगलात असतात. पण रात्री ते गावात येतात. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रशासनाकडून रासायनिक प्रक्रिया केलेल्या मच्छरदानी वाटप केल्या जाते.प्रशासन दर २.५ नागरिकांमागे १ मच्छरदानी अशी वाटपाची सरासरी आहे. यंदा केवळ १० हजार मच्छरदान्या वाटप करण्यात आल्या आहे. त्यामुळे वाटपाची सरासरी कमी करून प्रभावित क्षेत्रातील नागरिकांना तात्काळ मच्छरदानी वाटप करणे गरजेचे आहे.


जून ते डिसेंबर या महिन्यात हिवतापाचे रुग्ण वाढतात. त्यांमुळे यंत्रणा सतर्क आहे. गरोदर आणि स्तनदा मातांकडे विशेष लक्ष दिल्या जात आहे. हिवताप विभाग आणि जिल्हा आरोग्य प्रशासन हिवताप नियंत्रणात ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. - डॉ.पंकज हेमके, प्रभारी हिवताप अधिकारी



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !